
Winter Session : सत्ताधारी-विरोधकांची ‘दिशा’ भरकटली
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशी सत्ताधारी व विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. अभिनेता सुशांतसिंह आणि त्याची मॅनेजर दिशा सालियन यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाने गुरुवारी विधानसभेतील संपूर्ण कामकाजाची दिशा भरकटली. दिशा सालियान आत्महत्या प्रकरणाची चौकशी करून खासदार राहुल शेवाळे यांनी उल्लेख केलेली ‘एयू’ ही व्यक्ती कोण? याची माहिती द्या, अशी मागणी केली.
त्यानंतर भाजप-शिंदे गटाच्या आमदारांनी कामकाज रोखले. सत्ताधारी आमदारांच्या या गदारोळात सलग नऊ वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. तर, सत्ताधारी आमदारांच्या मागणीला प्रतिसाद देत दिशा सालियन आत्महत्येचा नव्याने तपास करण्यासाठी विशेष तपास पथक ( एसआयटी ) ची स्थापना करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मात्र, यानंतर विरोधकांनी फोन टॅपिंग प्रकरणातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचीही चौकशी करण्याची मागणी लावून धरली. मात्र त्यावर बोलण्याची संधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देत नाहीत याबद्दल संताप व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या तोंडातून अपशब्द निघाले. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक होत पाटील यांना निलंबित करा, अशी कठोर भूमिका घेतली. सत्ताधारी आमदारांनी यावरून जोरदार गदारोळ केला.
जयंत पाटील यांना या अधिवेशन कालावधीत निलंबित करण्याचा प्रस्ताव विधिमंडळ कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. तो आवाजी मताने मंजूर झाला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या सर्व प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करत सरकारच्या या भूमिकेचा निषेध करत सभात्याग केला. ‘‘३२ वर्षांच्या विधानसभेतील कारकिर्दीत जयंत पाटील यांच्यावर पहिल्यांदाच निलंबनाची कारवाई झाली. त्यांचा शब्द चुकला असला तरी विरोधकांचा आवाज दाबण्याचा जो प्रकार सभागृहात सुरू आहे त्याबाबतचा तो संताप होता,’’ अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.
खोके सरकारला हलवून ठेवले ः आदित्य
भ्र ष्टाचारी, गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचविण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू आहे. त्यांना व त्यांच्या खोके सरकारला एका ३२ वर्षाच्या तरुणाने हलवून ठेवले आहे. त्यामुळेच लक्ष्य करण्यात येत असल्याचा प्रतिहल्ला आदित्य ठाकरे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना केला. विधिमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस ‘ए यू. एयू कौन है?’ च्या मुद्याने गाजला. या प्रकरणाची आता ‘एसआयटी’मार्फत चौकशी करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. जे काही शोधायचे आहे ते शोधू द्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘एनआयटी’चा जो गैरव्यवहार आहे तो आम्हाला सभागृहात मांडू न देण्याचा हा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री यात फसल्याने हा खटाटोप सुरू असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
‘सीबीआय’वर विश्वास नाही काय?
वि रोधी पक्षातील आमदार सभागृहाचे कामकाज व्यवस्थित चालावे म्हणून प्रयत्न करीत आहेत. अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात येत आहेत. मात्र सत्ता पक्षातील आमदारांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून नौटंकी चालवली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’ या केंद्रांच्या संस्थेकडून केला असून सत्ताधाऱ्यांना त्यांच्यावर विश्वास नाही का, असा सवाल विधान सभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधान भवन परिसरात गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला. भास्कर जाधव म्हणाले की, सत्तापक्षाचे वागणे बेजबाबदार पणाचे आहे. सत्तापक्षाने गोंधळ न घालता कामकाज चालू द्यायला हवे. परंतु त्यांचे वागणे उलट आहे. हा एक प्रकारे लोकशाहीचा खून असल्याची टीका त्यांनी केली.
‘आदित्य ठाकरेंवरील आरोप राजकारणातून’
खासदार राहुल शेवाळे कधी संसदेत बोलत नाहीत. महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा मांडण्याऐवजी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले. मुंबईत बिहारी लोकांची मते मोठ्या प्रमाणात आहेत. या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात येत असल्याचे आमदार रोहित पवार यांनी केला. ते म्हणाले, की भाजपचे नेते निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी असे प्रयत्न सुरुवातीपासून करताहेत. यापूर्वी बिहारची निवडणूक असताना सुशातसिंह राजपूत यांच्या आत्महत्येचे राजकारण करण्यात आले. कर्नाटक निवडणुका येताच सीमावाद तापविण्यात येत आहे. तसाच प्रकार ‘एयू’ बाबत आहे.
आदित्य ठाकरेंची ‘नार्को’करा ः नीतेश राणे
सुं शातसिंह राजपूत आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आमदार आदित्य ठाकरे यांची नार्को चाचणी करा, अशी मागणी भाजप आमदार नीतेश राणे यांनी केली. या संदर्भात नीतेश राणे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्याची मागणी मी सुरवातीपासूनच करीत आहे. आता राहुल शेवाळे हे तेच बोलत आहे. रिया चक्रवर्तीला ४० पेक्षा जास्त मिस कॉल आहे. यात ‘एयू’ म्हणजे आदित्य ठाकरे आहेत.
सत्ताधारी व विरोधकांना समज
सत्ताधाऱ्यांनी विधानपरिषदेत ‘ये यू ...ये यू क्या है...’म्हणत घोषणाबाजी सुरु केली. सत्ताधाऱ्यांच्या या घोषणाबाजीला विरोधकांनीही दमदारपणे उत्तर देत घोषणाबाजी केली. यावर सभागृहाची गंभीरता लक्षात घेत सत्ताधारी आणि विरोधकांची नावे घेत यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी समज दिली.
‘राष्ट्रवादी’चे आज आंदोलन
जयंत पाटील यांना निलंबित केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी निषेध करत युवक राष्ट्रवादीच्या वतीने शुक्रवारी (ता.२३) राज्यभरात विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे.