No Mobile In Theater : सुमीतने घेतलेली भूमिका योग्यच; कलाकारांचा पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जून 2019

अभिनेता सुमीत राघवनने नाशिकमध्ये 'नॉक नॉक सेलिब्रिटी' या नाटकादरम्यान मोबाईल वाजल्याने प्रयोग थांबवला. यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. अनेक अभिनेत्यांनी सुमीतच्या पाठिशी ऊभे राहून नाटकादरम्यान मोबाईल वापरण्यास विरोध केला.

मुंबई : अभिनेता सुमीत राघवनने नाशिकमध्ये 'नॉक नॉक सेलिब्रिटी' या नाटकादरम्यान मोबाईल वाजल्याने प्रयोग थांबवला. यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. अनेक अभिनेत्यांनी सुमीतच्या पाठिशी ऊभे राहून नाटकादरम्यान मोबाईल वापरण्यास विरोध केला. यावर सुमीत राघवनला काही चाहत्यांची नाराजी सहन करावी लागली, तर काहींनी त्याला पाठिंबा दिला.

No Mobile In Theater : नाटक चालू आहे, पण शांतता कुठंय?

'नाशिक येथे प्रयोगादरम्यान घडलेला प्रकार पुन्हा उद्‌भवू नये यासाठी प्रेक्षकांना कसे साक्षर करावे, हेच मला समजत नाही. यावर नाट्यगृहामध्ये जॅमर बसवणे हा जो उपाय पुढे येत आहे. हा उपाय किती योग्य आहे, हे आता सांगता येत नाही. नाट्यगृह किंवा चित्रपटगृहाबाहेर नो स्मोकिंगचे बोर्ड असतात, तसे मोबाईल सायलेंटवर असल्याचेही बोर्ड लावावेत. यावर राज्य सरकारने तोडगा काढला पाहिजे. एखाद्या प्रेक्षकाच्या बेशिस्तीमुळे अन्य प्रेक्षकांना आणि कलाकारांना सादरीकरणात त्रास झाल्यास त्या प्रेक्षकावर दंड आकारावा. असा नियम केल्यास प्रेक्षक आपल्या वागणूकीबाबत साक्षर होतील, असे वाटते,' असे मत सुमीत राघवनने 'सकाळ'कडे व्यक्त केले.  

असाच अनुभव अभिनेता चिन्मय मांडलेकरला त्याच्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान आला होता. त्यानेही सुमीतला पाठिंबा देत आपले मत मांडले. 'प्रत्येक कलाकाराला त्रास होतो व तो त्याप्रमाणे आपली भूमिका घेतो. सुमितने घेतलेली भूमिका ही केवळ त्या दिवसापुरती मर्यादित नाही. हा त्रास सर्व कलाकारांना सातत्याने होत आहे. नाटक पाहायला येणारे प्रेक्षक स्वतःला शिस्त कधी लावून घेणार, हा कळीचा मुद्दा आहे,' अशी प्रतिक्रिया चिन्मयने दिली.  

"नाटकाचा प्रयोग चालू असताना मोबाईल वाजला तेव्हा मी सगळ्यात आधी प्रयोग थांबवण्याची पद्धत सुरू केली. परंतु त्यानंतर दुर्दैवाने असे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे "नॉक नॉक सेलिब्रिटी' या नाटकाच्या प्रयोगा दरम्यान सुमित राघवनने जे केले. ते अतिशय योग्य केले. असे प्रकार घडल्यास त्या नटाने किंवा नटीने प्रयोग थांबवायलाच हवा.'
- विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेते

"अभिनय करताना नाटकामध्ये जर मोबाईल वाजला तर मीसुद्धा हेच करतो. माझ्या एका प्रयोगाला सुद्धा मी पाच वेळेला नाटक थांबवले होते. त्यावेळेला प्रेक्षकांकडून अरेरावीची भाषा आली होती. परंतु नाटक किंवा सिनेमाला जाताना मोबाईल बंद ठेवणे हा संस्कारांचा भाग आहे. मुख्य गोष्ट म्हणजे नाटकादरम्यान मोबाईल वाजून अरेरावी करणाऱ्यांची संख्या अगदीच दोन टक्के वेगैरे असते. त्यामुळे फक्त एवढ्या लोकांसाठी संपूर्ण माहोलला धक्का लागतो. अशा प्रेक्षकांना माय-बाप कसे म्हणता येईल? असे प्रकार घडल्यास निर्मात्यांनी सुद्धा ठाम भूमिका घेणे आवश्‍यक आहे. अशावेळी नाटकातील कलाकारांच्या बाजूने उभे राहणे गरजेचे आहे.'' 
- आस्ताद काळे, अभिनेते 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sumeet Raghvan takes proper action says all actors