
Sushilkumar Shinde : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे अॅक्टिव्ह मोडमध्ये
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे मागील अनेक दिवसानंतर सोलापुरात तळ ठोकून आहेत. सोलापूर लोकसभा आणि सोलापूर महानगरपालिका या दोन्ही महत्त्वाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तयारीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा मुक्काम राहत असून विशेषत्वे, सोलापूर लोकसभेच्या मतदार संघातील अनेक नेतेमंडळी यांच्यासोबत त्यांची चर्चा होत असून ते या निवडणुकीचा कानोसा घेत मोर्चेबांधणी करीत आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे लोकसभेच्या येथील आखाड्यातून दस्तुरखुद्द सुशीलकुमार हे उभे ठाकणार की त्यांच्या वारसदार कन्या आमदार प्रणिती शिंदे या युवा नेतृत्व म्हणून आखाड्यात उतरणार? या संदर्भात अद्याप स्पष्टता नसली तरी सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र आत्तापासूनच लोकसभेची तयारी सुरू ठेवली आहे. काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात खासदारकीच्या मागच्या दोन टर्ममध्ये भाजपचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे सोलापूर लोकसभा हा भाजपचा गड मानला जात आहे.
या दरम्यान या मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांना दोन वेळा हार पत्करावी लागली. जिव्हारी लागलेला पराभवाचा कलंक पुसून काढण्यासाठी सुशीलकुमार हे या खेपेस सोलापूर लोकसभेची निवडणूक पुन्हा लढतील. विजयाचा गुलाल अंगावर घेऊन राजकीय स्वेच्छानिवृत्ती घेतील असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. या खेपेची लोकसभा त्यांनीच लढवावी, अशी गळ काँग्रेससह राष्ट्रवादीकडून घातली जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला सुशीलकुमार शिंदे यांनी स्वतःहून सोलापूर लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे.
तथापि, लोकसभा लढणार नसल्याचे यापूर्वी तीन वेळा सांगितलेल्या श्री शिंदे यांनी निवडणुका लढविलेल्या आहेत. त्याप्रमाणे वर्षभरावर येऊन ठेपलेली सोलापूर लोकसभेची निवडणूक सुशीलकुमार लढवतील, अशी खात्री जाणकारांना वाटते. दरम्यान याच वळणावर यांच्या वारसदार कन्या प्रणिती शिंदे या लोकसभेची निवडणूक पहिल्यांदा लढवतील असेही तर्क आणि आडाखे बांधले जात आहेत. पित्याप्रमाणे दिल्लीच्या राजकारणात जाऊन स्वतःचा मापदंड निर्माण करण्याच्या प्रयत्नातूनच प्रणिती शिंदे या गांधी घराण्याची जवळीक साधत आहेत ‘भारत जोडो’ यात्रेसाठी राहुल गांधी यांच्या समवेत त्यांनी दिलेले योगदान हे त्याचेच द्योतक असल्याचे मानले जाते.
सुशीलकुमारांची प्रकृती, त्यांचे झालेले वय हे लक्षात घेता, खुद्द सुशीलकुमार हेच प्रणिती शिंदे यांना लोकसभेच्या आखाड्यात उतरवतील अशी ही अटकळ बांधली जात आहे. मात्र सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसच्यावतीने आपण स्वतः उभे ठाकू किंवा कन्या प्रणिती शिंदे या आखाड्यात असतील याचा जरी निर्णय झाला नसला तरी सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे आणि सोलापूर लोकसभेची तयारी सुरू ठेवली आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच, मागच्या अनेक दिवसानंतर सुशीलकुमार हे सोलापुरात तळ ठोकून आहेत. सोलापूर लोकसभेच्या मतदारसंघातील अक्कलकोट मंगळवेढा पंढरपूर मोहोळ दक्षिण आणि उत्तर सोलापूर या ग्रामीण विधानसभेच्या मतदारसंघासह सोलापूर शहरातील विधानसभेच्या मतदार संघातील अनेक नेतेमंडळी, प्रमुख कार्यकर्ते यांच्या समवेत सुशीलकुमार हे निवडणुकीच्या दृष्टीनेचर्चा करून कानोसा घेत आहेत. त्यांच्या या चाललेल्या हालचाली लोकसभा निवडणुकीची तयारी आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने, सुशीलकुमार यांचा सोलापुरातील मुक्कामदेखील भविष्यात वाढणार आहे, असे सांगण्यात आले.
‘जनवात्सल्य’वर मुक्काम अन् निवडणुकांचे खलबते
सोलापूर लोकसभा आणि सोलापूर महानगरपालिका या दोन्ही महत्त्वाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, सुशीलकुमार शिंदे हे मागच्या अनेक दिवसांपासून सोलापुरात तळ ठोकून आहेत. सोलापुरातील सात रस्ता परिसरातल्या ‘जनवात्सल्य’ या निवासस्थानी त्यांनी निवडणुकीच्या संदर्भातील खलबते सुरू ठेवले आहेत.