Sushma Andhare: माझा बाई म्हणून एकेरी उल्लेख करतात, पण मी...सुषमा अंधारे संतापल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushma Andhare: माझा बाई म्हणून एकेरी उल्लेख करतात, पण मी...सुषमा अंधारे संतापल्या

Sushma Andhare: माझा बाई म्हणून एकेरी उल्लेख करतात, पण मी...सुषमा अंधारे संतापल्या

मी तुम्हाला तोंडभरून भाऊ म्हणते आणि तुम्ही माझा बाई असा एकेरी उल्लेख करता? ही कोणती पद्धत आहे? असा संतप्त सवाल सुषमा अंधारे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. (Sushma Andhare Slams Minister Gulabrao Patil maharashtra politics)

दोन दिवसांपूर्वी, सुषमा अंधारे तीन महिन्यापूर्वीच पक्षात आल्या असून त्या तीन महिन्यांचं बाळ असल्याचा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. त्यांच्या या विधानाला सुषमा अंधारे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

गुलाबराव पाटील माझा बाई म्हणून एकेरी उल्लेख करतात. मी तुमचा हजारवेळा भाऊ म्हणून उल्लेख करते. तरीही तुम्ही माझा एकेरी उल्लेख करता. ही कोणती पद्धत आहे? असा सवाल त्यांनी केला.

सुषमा अंधारे धरणगाव दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी संवाद साधताना थेट गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. गुलाबराव पाटील गद्दारीचा शिक्का घेऊन फिरत आहे. गुलाबराव पाटील यांना पाणीवाले बाबा व्हायचं आहे. पण ते पिण्याचं पाणी आहे की सायंकाळी ग्लासात घेण्यात येणारे पाणी आहे, याचा शोध घ्यायला हवा, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

तसेच, शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पण त्यावर ते चकार शब्द बोलत नाहीत. त्यावर बोलण्यासाठी अभ्यास असायला हवा. कसे बोलतील?, असा टोलाही त्यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला. तसेच गुजरातला जाणाऱ्या प्रकल्पावरून राज्य सरकारवर टीकाही केली.

गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?

ते तीन महिन्याच बाळ आहे, सुषमा अंधारे यांना बाई म्हणत गुलाबराव पाटील म्हणाले की, या बाईने बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांच्यावर केलेली चिखलफेक, तसेच हिंदू देवतांवर त्या काय काय बोलल्या आहेत, त्याच्याही क्लिप दाखवाव्यात. आम्ही आमच्यावर केलेल्या टीका सहन करणार नाही, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अंधारे यांना दिला आहे.