

मुंबई : ‘‘गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील हे बाबरीच्या आठवणींच्या खंदकातून बाहेर पडले आहेत. ज्यावेळी बाबरी पाडली तेव्हा हे सगळे ‘उंदीर’ बिळात लपले होते,’’ अशा खरमरीत शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आणि बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, नाहीतर स्वत: राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
चंद्रकांत पाटील यांनी ‘बाबरी मशीद पाडताना शिवसैनिक नव्हते’ या वक्तव्यावरून संतापलेल्या उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेत टीका केली. ते म्हणाले, बाबरी पाडली त्यावेळी भाजपचे तत्कालीन उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांनी जाहीर केले होते की, बाबरी पाडण्यामध्ये भाजप वगैरे कोणी नाही.
नपुंसक नेतृत्व म्हणून तेव्हा बाळासाहेबांनी चीड व्यक्त केली होती, असे सांगताना लालकृष्ण अडवानी यांनी दिलेल्या मुलाखती पाहाव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला. अयोध्येतील खटल्यांमध्ये आरोपी म्हणून बाळासाहेबांचे नाव होते याची आठवण ही त्यांनी करून दिली.
बाबरी कोणी पाडली याबाबत बाळासाहेबांकडे विचारणा झाली तेव्हा ते म्हणाले, माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर, मला अभिमान आहे असे त्यांनी सांगितले होते, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली.
भाजपच्या आताच्या नेतृत्वावर चपराक लगावण्याची संधी ठाकरे यांनी सोडली नाही. ते म्हणाले, ‘‘तेव्हा आताच्या पंतप्रधानांचे नाव कुठेही नव्हते. बांगलादेशच्या युद्धात म्हणजे सत्याग्रहात ते सहभागी होते, पण बाबरीच्या आंदोलनावेळी ते हिमालयातही असतील.’’
‘‘मुंबईत दंगली झाल्या त्यावेळी आमची सत्ता नव्हती तरीही आम्ही मुंबई वाचविली, शिवसैनिकांनी काही दर्ग्यांनाही संरक्षण दिले. आता कोणी त्या वयात शाळेच्या सहलीला गेले असतील, आणि सांगताहेत आमच्या आजूबाजूने गोळ्या गेल्या. कोण म्हणते आम्ही तुरुंगात होतो, मग इतके वर्षे गप्प का होतात,’’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
ठाकरेंनी यावेळी भाजपचा उल्लेख ‘भरकटलेला जनता पक्ष’ असा केला. ‘‘मोगलांचा इतिहास पुसता पुसता हिंदूंचा इतिहासही पुसणार आहात का?,’’ असा प्रश्नही त्यांनी विचारला. कोणाला जोडो मारणार?
‘‘भरकटलेला जनता पक्ष बाळासाहेबांचा अपमान करतोय. त्यांच्यासोबत किती दिवस तळवे चाटणार आहात. बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणविणारे कुणाला जोडे मारणार आहेत? की स्वतःच स्वतःला जोडे मारणार आहेत? अशा लोकांसोबत राहणार असाल तर बाळासाहेब आणि शिवसेना नाव घेऊ नका. बाळासाहेबांचे विचारवाले जे मुख्यमंत्री म्हणून बसले आहेत, त्यांनी चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी करावी, नाहीतर स्वत: राजीनामा द्यावा,’’ अशी मागणी त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.