या जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी शाळा सुरु करण्यास केला विरोध 

संतोष सिरसट 
Thursday, 25 June 2020

शाळा व्यवस्थापन समिती घेणार निर्णय 
दरम्यान, शिक्षणाधिकारी साळुंके यांनी शासनाचा 15 जूनचा आदेश व शाळा व्यवस्थापन समितीने शाळा सुरु करण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा असे सांगितले. कुणी काहीही म्हटले तरी शाळा सुरु करण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीला घ्यायचा आहे. मुख्याध्यापकांनी समितीची बैठक घेऊन बैठकीत जे ठरेल तशाप्रकरचा ठराव शिक्षणाधिकाऱ्यांकडे देण्याचे आवाहनही साळुंके यांनी केले. 

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील खासगी माध्यमिक शाळांच्या शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांनी घेतली. त्या बैठकीमध्ये सर्वच संघटनेच्या प्रतिनिधींनी शिक्षण विभागाने मुलांच्या जिवाशी न खेळता कोरोना पूर्णपणे नाहिसा झाल्याशिवाय शाळा सुरु करण्यास विरोध केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा कधी सुरु होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

शासनाने 15 जूनच्या आदेशानुसार शाळा सुरु करण्याबाबतचे टप्पे ठरवून दिले आहेत. मात्र, जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती पाहिली असता त्या टप्यानुसार शाळा सुरु करणे मुश्‍किल असल्याचेही संघटनेच्या प्रतिनिधींनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कानावर घातले. शाळांच्या बाबतीत शहरी व ग्रामीण असा भेदभाव केला जात असल्याचे संघटना प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले. शहर-ग्रामीण असा भेट न करता सर्वांसाठी एकच निर्णय घ्यायला हवा असे मत संघटनांनी मांडले. ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला तर त्या शाळेवर जाणारे शिक्षक हे सोलापूर शहरातून जाणारे आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. याशिवाय काही पालकही कामानिमित्त सोलापूरशी जोडलेले आहेत. त्यापासूनही संसर्ग होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शहर-ग्रामीण असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता कोरोनाचा संसर्ग नाहिसा झाल्यानंतर शाळा सुरु करण्याची मागणी संघटनांच्यावतीने या बैठकीत करण्यात आली. 

शिक्षण विभाग जबाबदारी घेईना 
शाळा सुरु करण्याच्या संदर्भात शिक्षण विभाग कोणतीच जबाबदारी घेत नाही. याचा थेट संबंध मुलांच्या जीवाशी असल्यामुळे त्या गावातील शाळा व्यवस्थापन समितीनेच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. दुर्दैवाने काही घटना घडल्यास त्याला शाळा व्यवस्थापन समितीच जबाबदार राहणार असल्याचे संकेतही शिक्षण विभागाने आजच्या बैठकीत दिले आहेत. 

एकही सुटी घेणार नाही 
कोरोनाचा संसर्ग पूर्ण संपल्यानंतरच शाळा सुरु करा. शाळा चालू झाल्यानंतर दिवाळी, उन्हाळा, शनिवार, रविवार अशी एकही सुटी घेणार नसल्याचे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले. त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी तसे लेखी देण्यास सांगितले. लेखी देण्यासही संघटनांचे प्रतिनिधी तयार झाले आहेत. 

बैठकीसाठी 16 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची हजेरी 
महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर, राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष जितेंद्र पवार, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे शंकर वडणे, ठोका संघटनेचे सर्जेराव जाधव, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर बिराजदार, शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर, मुख्याध्यापक महामंडळाचे मन्मथ उकरंडे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे रेवणसिद्ध रोडगीकर, शहर मुख्याध्यापक संघाचे शिवाजी चापले, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे हरिदास गवळी, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जीवन यादव, आर. डी. कांगुर्णे, प्रहारचे सचिन नागटिळक, इंग्लिश शाळा असोसिएशनचे गणेश नीळ हे या बैठकीसाठी उपस्थित होते. याशिवाय विस्तार अधिकारी अशोक भांजे, सहायक शिक्षण निरीक्षक मिलिंद मोरे उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers' unions in this district opposed the start of the school