शिक्षण आयुक्तांच्या संचमान्यतेत सुधारण्याच्या प्रस्तावाला शिक्षक संघटनांचा विरोध 

संतोष सिरसट 
Monday, 7 September 2020

शासनाने विचारपूर्वक निर्णय घ्यावा 
संचमान्यतेच्याबाबतीत शिक्षण आयुक्तांनी निकषांमध्ये काही सुधारणा सुचविल्या आहेत. त्या सुधारणा गरीब मुलांच्या शिक्षणावर टाच आणणाऱ्या असल्याचे मत शिक्षण संघटनांनी व्यक्त केले आहे. संचमान्यतेत सुधारणा करताना घटलेल्या जन्मदाराचाही विचार होणे अपेक्षीत आहे. जन्मदर घटत असताना वर्गामध्ये विद्यार्थीसंख्या वाढविणे योग्य होणार नाही, असाही मतप्रवाह शिक्षण क्षेत्रातून पुढे येत आहे. त्यामुळे संचमान्यतेबाबत निर्णय घेताना तो विचारपूर्वक घ्यावा, अशी अपेक्षा आहे. 

सोलापूर ः राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या संचमान्यतेमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्त विशाल साळुंके यांनी शासनाला पाठविला आहे. त्या प्रस्तावामध्ये अनेक त्रुटी आहेत शिक्षण व्यवस्था उध्वस्त करण्याचा तो प्रस्ताव आहे. त्यामुळे आयुक्तांच्या संचमान्यतेबाबतच्या प्रस्तावा शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. 

राज्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अनेक बदल करताना गरिबाच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न काही अधिकाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोपही शिक्षक संघटनांनी केला आहे. संचमान्यतेचे निकष सुधारीत करण्याची गरज होती का? असाही सवाल या शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे. आयुक्तांनी संचमान्यतेबाबत केलेल्या शिफारशी विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा आणणाऱ्या आहेत. नव्या प्रस्तावामुळे शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणे दुरापास्त होणार आहे. खरे पूर्वीच्या शिक्षण धोरणात सुधारणा करण्याची आवश्‍यकता असताना नव्याने प्रस्ताव पाठविणे शैक्षणिकदृष्ट्या अहिताचे असल्याचे मत शिक्षक संघटनांनी व्यक्त केले आहे. शिक्षण आयुक्तांनी 13 जुलैला शासनाला पाठविलेले परिपत्रक तत्काळ रद्द करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्यावतीने प्रभारी शिक्षणाधकारी सुधा साळुंके यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. यावेळी मुख्याध्यापक संघाचे सचिव रंगसिद्ध दसाडे, उपाध्यक्ष विश्रांत गायकवाड, रेवणसिद्ध रोडगीकर, श्रावण बिराजदार, राजकुमार भोरे, ए. जी. पाटील, सदाशिव व्हनमाने, अण्णासाहेब भालशंकर, शिवाजी चापले, अंबादास चाबुकस्वार, एस. के. स्वामी, गिरीष कुलकर्णी उपस्थित होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers' unions oppose proposal to improve the composition of the Commissioner of Education