शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे सक्‍तीचे करणारा कायदा आणणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

मराठी भाषा भवन ‘रंगभवन’मध्येच
मराठी भाषा भवन रंगभवनमध्येच व्हावे, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. रंगभवन ही वास्तू हेरिटेजच्या यादीत असल्याने मराठी भाषा भवनच्या निर्मितीत अडथळे येत आहेत; मात्र रंगभवन हे 1956 च्या सुमारास बांधले गेले असल्याने ते हेरिटेजच्या यादीत येण्याबाबत प्रश्‍नचिन्ह आहेत. त्याविषयी अधिक माहिती घेण्याचे काम विभागाकडून सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. रंगभवनच्या शेजारी रुग्णालय असल्याने ध्वनिप्रदूषणाबाबतही शंका उपस्थित करण्यात आली होती. या सर्व प्रश्‍नांबाबत नव्याने पडताळणी केली जाणार असल्याचे देसाई म्हणाले.

मुंबई - शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे सक्‍तीची करणारा कायदा आगामी अर्थसंकल्पी अधिवेशनात मंजुरीसाठी आणला जाणार असल्याची माहिती भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. राज्यातील जवळपास 25 हजार शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही. अशा शाळांमधूनही मराठीचे धडे दिले जावेत, यासाठी राज्य सरकार कायदा आणणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात मराठी भाषेच्या शाळांची संख्या कमी असल्याची चिंता वाटत असली, तरी पालकांनी कोणत्या शाळेत मुलांना शिकवावे यासाठी सक्‍ती करता येणार नाही; मात्र मातृभाषेच्या शाळांमधून मुलाना शिकवावे, असे आवाहनही देसाई यांनी केले. 

शिक्षणाच्या माध्यमातून भाषा जिवंत ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्‍यक असल्यानेच शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे सक्‍तीचे करणारा कायदा अधिवेशनात आणणार असल्याचे ते म्हणाले. या कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्याबाबतचा विचार केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांव्यतिरिक्‍त केंद्रीय शाळा, इतर बोर्डाच्या सुमारे 25 हजार शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसल्याची माहिती देसाई यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teaching Marathi language in schools will bring in a compelling law