
Exam: दहावीची इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा ऑफलाइनच
पुणे : राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त कला गुणांसाठी फेब्रुवारीमध्ये ऑनलाइन पद्धतीने होणारी इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा (इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) रद्द करण्यात आली आहे. आता ही परीक्षा दहावीची मुख्य लेखी परीक्षा झाल्यानंतर एप्रिल २०२२मध्ये ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे कला संचालनालयाने जाहीर केले आहे.
ऑफलाइन परीक्षेच्या निर्णयामुळे सवलतीचे अतिरिक्त कला गुण विद्यार्थ्यांना देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्यात दरवर्षी दहावीतील साधारणत: ७० हजार विद्यार्थी ही परीक्षा देतात. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त कला गुणांचा लाभ मिळण्यासाठी चित्रकलेची श्रेणी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये दहावीच्या परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्याचे नियोजन यापूर्वी केले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आली होती.
हेही वाचा: तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर पुणे विद्यापीठातील वसतिगृहे सुरू
परंतु नाव नोंदणी दरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार करता शासकीय रेखाकला (इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाचे १० फेब्रुवारीचे परिपत्रक रद्द करण्यात आले. तसेच त्यावेळी नाव नोंदणीसाठी दिलेली लिंक देखील बंद करण्यात येत आहे. यापूर्वी ऑनलाइन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य कला संचालनालयाचे कला संचालक राजीव मिश्रा यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.
आता शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील इयत्ता दहावी मुलभूत/कला शिक्षक प्रशिक्षण पदविका (प्रथम वर्ष) अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी एप्रिल २०२२मध्ये ऑफलाइन पद्धतीने शासकीय रेखाकला २०२१ परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याकरिता पूर्वीप्रमाणेच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी आपल्या नावाची नोंदणी करायची आहे. मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यायची आहे. ऑफलाइन पद्धतीने परीक्षा आयोजनाबाबत सविस्तर माहिती ‘https://doa.maharashtra.gov.in/’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असेही मिश्रा यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.
इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षेचे दहावीत असे मिळतात गुण :
श्रेणी : मिळणारे गुण
ए श्रेणी : ७
बी श्रेणी : ५
सी श्रेणी : ३
....
इन्फोबॉक्स :
‘‘इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार होती. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन नाव नोंदणी करताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याचे दिसून आले. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षेतील मर्यादा लक्षात घेऊन, ही परीक्षा यापूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने घेण्याची मागणी कला अध्यापक संघ महामंडळाने केली होती. ऑफलाइन परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.’’
- श्रावण जाधव, अध्यक्ष, पुणे जिल्हा शाखा, महाराष्ट्र राज्य कला अध्यापक संघ महामंडळ
Web Title: Tenth Class Painting Exam Offline Updates
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..