ठाकरे पिता-पूत्र ऑक्‍टोबरअखेर सोलापुरात ! शरद पवारांसह महाविकास आघाडीतील दहा मंत्र्यांनी केले दौरे

3mukhyamantri_20sharad_20pawar.jpg
3mukhyamantri_20sharad_20pawar.jpg

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभरात वाढू लागला असून आढावा बैठकीच्या निमित्ताने मंत्र्यांचे सोलापूर दौरे वाढले आहेत. राज्याच्या मंत्रीमंडळातील आठ कॅबिनेट मंत्र्यांसह दोन राज्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारचे मास्टर माईंड तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही दोनदा सोलापूर दौरा केला आहे. आता पुन्हा ते सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य मंत्री 28 किंवा 29 ऑक्‍टोबरला सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. 


राज्यात अनपेक्षितपणे वर्षानुवर्षाच्या विरोधकांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. मात्र, कॉंग्रेसची नाराजी अन्‌ राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते तथा मंत्र्यांची मनमानी वाढत असल्याची चर्चा आहे. त्या संधीच्या प्रतीक्षेतील भाजपकडून सरकार पाडून आपले सरकार पुन्हा आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरुच असल्याचीही चर्चा आहे. तसेच आगामी वर्षात महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपालिकांच्या निवडणुकाही आहेत. त्यावेळी राज्यातील तीन पक्षाचे सरकार एकत्रित असेल की नाही, हे अद्याप कोणीच ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपापली ताकद मजबूत करण्याचा प्रयत्न करु लागला आहे. नवयुवक, सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, कामगारांना पक्षासोबत जोडण्याचा प्रयत्न करीत असतानाच जुन्या पदाधिकाऱ्यांचीही सांगड घातली जात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नाराज झालेल्यांची नाराजीही दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राज्यात सत्तेत असलेले तिन्ही पक्ष सोबत दिसणार की, जागा वाटपावरुन वेगवेगळे लढणार, याची उत्सुकता लागली आहे. 


सहा महिन्यांत सोलापूर दौऱ्यावर आलेले नेते
गृहमंत्री अनिल देशमुख, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, कृषी मंत्री दादा भुसे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे या मंत्र्यांनी आतापर्यंत दौरे केले आहेत. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही सोलापूर दौरा केला आहे. वंचित बहूजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनीही दौरा केला आहे.


"राष्ट्रवादी'चे मतदारसंघनिहाय अभिप्राय अभियान
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात राष्ट्रवादीचे नेते यशस्वी ठरले. त्यांनी शिवसेना, कॉंग्रेसला सोबत घेऊन सत्तेची यशस्वी मोट बांधली. मात्र, आगामी पाच वर्षांत राज्यातील कोणत्या विधानसभा व लोकसभा मतदारसंघात लक्ष देण्याची गरज आहे, काय बदल करावे लागतील, त्या मतदारसंघातील नेमके प्रश्‍न कोणते, याची माहिती व्हावी म्हणून ऑनलाइन अभिप्राय अभियान राबविले. त्याचा डाटा प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आला असून त्यादृष्टीने आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दौरे सुरु केल्याची चर्चा आहे. तर धनगर आरक्षणावर आतापर्यंत काहीच न बोलले मुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यात काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com