ठाकरे सरकारचा भाजपच्या मिरगणेंना झटका, मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या पदावरून हटविले 

प्रमोद बोडके
Thursday, 3 September 2020

मिरगणे यांच्याकडे असलेल्या पदामुळे कायमच राजकीय खिचडी असलेल्या बार्शी तालुक्‍यात संभ्रम निर्माण झाला होता. राज्यात 2014 पर्यंत कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना राजेंद्र मिरगणे हे राष्ट्रवादीच्या व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे मानले जात होते. 2014 पासून राजेंद्र मिरगणे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात गेले. महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाच्या सह अध्यक्ष पदी 13 ऑगस्ट 2019 रोजी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. राज्याच्या गृहनिर्माण विभागाने ही नियुक्ती रद्द केली असून याबाबतचा शासन निर्णय आज घेतला आहे. मिरगणे यांची नियुक्ती तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत असून वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार अनुज्ञेय असलेल्या सेवा सुविधा बंद करण्यात आल्याचेही या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. 

सोलापूर : राज्यात सत्तांतर होऊन देखील बार्शीचे भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांच्याकडे महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळचे सहा अध्यक्ष पद कायम होते या पदाच्या माध्यमातून मिरगणे यांच्याकडे असलेल्या मंत्रिपदाचा दर्जा सरकार बदलल्यानंतरही कायम होता. मिरगणे यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर परवडणाऱ्या घरांच्या योजनेबाबत सादरीकरणही केले होते. या सादरीकरणानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. 

राज्यातील सरकार बदलले तरीही भाजप नेते मिरगणे यांच्याकडील हे पद कायम कसे? याबद्दल अनेक शंकाकुशंका निर्माण केल्या जात होत्या. राष्ट्रवादीचे तत्कालिन ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीप सोपल यांनी बार्शीच्या विधानसभेसाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. 2019 ची विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजप युती एकत्रित लढल्याने आणि सोपल यांच्या माध्यमातून विद्यमान आमदार सेनेकडे आल्याने युतीतून ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली.

सोपल यांचे प्रतिस्पर्धी असलेले राजेंद्र राऊत तत्पुर्वी भाजपमध्ये जाऊन 2019 ची निवडणूक लढण्याची रणनिती आखून बसले होते. आयत्यावेळी सोपल हे युतीचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी अपक्ष म्हणून निवडणूकीत उडी घेतली. राऊत यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक जिंकली. 2014 मध्ये भाजपकडून येथून राजेंद्र मिरगणे यांनी निवडणूक लढविली होती. राज्यात सत्तांतर होऊन देखील मिरगणे यांच्याकडे राज्यमंत्री दर्जाचे पद कायम होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Thackeray government has dealt a blow to the BJP, removing him from the post of minister