

kharip
sakal
सोलापूर : जूनचा पंधरवडा उलटून गेला, तरी जिल्ह्यात समाधानकारक पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गतवर्षी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसमोर यंदा अपुऱ्या पावसाचे संकट उभे ठाकल्याने खरीप हंगामाबाबत अनिश्चितता वाढली आहे.
सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४६.२ मिलिमीटर पाऊस झाला असून, तो जून महिन्याच्या सरासरीच्या केवळ ४५.१ टक्के आहे. जूनमधील जिल्ह्याची सरासरी पर्जन्यमानाची गरज १०२.५ मिलिमीटर इतकी असताना यंदा ५६.३ मिलिमीटरची तूट नोंदविली गेली आहे. परिणामी, कोणत्याही तालुक्यात अद्याप मोठ्या प्रमाणावर पेरणी सुरू झालेली नाही.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मशागत, नांगरणी, वखरणीची कामे पूर्ण करून बियाणे व खतांच्या खरेदीची तयारी केली आहे. मात्र, पुरेशा पावसाअभावी पेरणीचे नियोजन पुढे ढकलावे लागत आहे. यंदा अवकाळी पावसानेही अपेक्षित साथ दिली नाही. त्यातच मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे अनेक बागायती पिकांनी यंदाच्या तीव्र उन्हाळ्यातही तग धरला. मात्र, आता भूजलपातळी खालावत असून अनेक बोअरवेल्सची पाण्याची क्षमता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे.
शेतकऱ्यांचे लक्ष आर्द्रा नक्षत्राकडे
हवामान विभागाने २१ जूनपासून वातावरणात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर दाते पंचांगानुसार २२ जूनपासून सुरू होणाऱ्या आर्द्रा नक्षत्रात पावसाला सुरवात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता आगामी आठवड्याकडे लागले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पावसाची स्थिती
जून महिन्याची सरासरी १०२.५ मिमी
आतापर्यंत झालेला पाऊस ४६.२ मिमी
सरासरीच्या तुलनेत ४५.१ टक्के
पावसाची तूट ५६.३ मिमी
तालुकानिहाय पाऊस (मिमी)
तालुका पाऊस
उत्तर सोलापूर २७.८
दक्षिण सोलापूर २१.५
बार्शी ५४.६
अक्कलकोट ३१.६
मोहोळ ३७.८
माढा ४४.५
करमाळा ८१.२
पंढरपूर ३१.८
सांगोला ४९.२
माळशिरस ८१.१
मंगळवेढा २९.९
एकूण ४६.२
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता
एल निनोच्या परिणामामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. अधिक कालावधीची व जास्त पाणी लागणारी पिके नव्याने घेण्याचे टाळावे.
- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.