एकट्या प्रणिती शिंदेंवर ‘महाविकास’ची धुरा! जिल्ह्यात २ खासदार व‌ १० आमदार सत्ताधारी; वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्याची तयारी

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा गट भाजप-शिंदे सेनेसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे राजकारणच बदलले आहे. जिल्ह्यातील महाविकास आघाडीची धुरा काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर आली आहे.
mla praniti shinde
mla praniti shindesakal

सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा गट भाजप-शिंदे सेनेसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे राजकारणच बदलले आहे. कालपर्यंत खांद्याला खांदा लावून सत्ताधाऱ्यांविरूद्ध आवाज उठविणारेच आता सत्तेत सहभागी झाल्याने जिल्ह्यातील महाविकास आघाडीची धुरा काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर आली आहे. बहुतेक आमदारांकडे शिक्षण संस्था, साखर कारखाने, जिल्हा बॅंक, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशी सत्तेची केंद्रे आहेत. त्यातून त्यांनी राजकारणाची सुरवात केली आणि अनेकजण टिकूनही आहेत.

मात्र, यापैकी काहीही सोबत नसताना आमदार प्रणिती शिंदेंनी बहुभाषिक, बहुजातीय मतदारसंघातून आमदारकीची हॅटट्रिक साधली. आता जिल्ह्यात विरोधी पक्षाच्या त्या एकमेव आमदार आहेत. जिल्ह्यातील १० आमदार, दोन खासदारांचे त्यांच्यासमोर तगडे आव्हान असणार आहे.

राज्यात दोन्ही काँग्रेस एकत्रित असताना सोलापूर जिल्ह्यात एकही आमदार विरोधी पक्षाचा नव्हता, हे विशेष. कालांतराने राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तरीपण सांगोला वगळता जिल्ह्यातील बहुतेक मतदारसंघावर काँग्रेस, राष्ट्रवादीचेच वर्चस्व होते. त्यावेळी पक्षनिष्ठेला फार महत्त्व होते. पण सध्या पक्षनिष्ठा, मतदारांचा कौल बाजूला ठेवून लोकप्रतिनिधी पक्षांतर करीत आहेत. आता जिल्ह्यातील ‘शहर मध्य’ वगळता उर्वरित १० मतदारसंघातील आमदार विरोधी पक्षाचेच आहेत. काँग्रेसकडे दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व शहर मध्य हे चार मतदारसंघ आहेत. पंढरपूर-मंगळवेढा हा काँग्रेसचा मतदारसंघ आता राष्ट्रवादीकडे आहे. त्याबदल्यात करमाळा, सांगोला की शहर उत्तर मतदारसंघ मिळेल, याचे तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, मोहोळ मतदारसंघात माजी आमदार राजन पाटलांचे वर्चस्व असून सोलापूर लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाची मोठी निर्णायक भूमिका राहिली आहे. सध्या त्यांचा कल नेमका कोणाकडे, हे अजून अस्पष्ट आहे. हा मतदारसंघ खुला झाल्यापासून पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणण्यात राजन पाटलांचे मोठे योगदान राहिले आहे.

दक्षिण सोलापूर मतदारसंघातही मागील निवडणुकीत माजी आमदार दिलीप मानेंची ताकद काँग्रेसचे उमेदवार बाबा मिस्त्रींच्या पाठीशी असती, तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते, अशीही चर्चा झाली. एकूणच अनेक मतदारसंघातील बलाढ्य नेतेमंडळी विरोधी पक्षासोबत गेल्याने जिल्ह्यात महाविकास आघाडीची वज्रमूठ मजबूत करून विरोधकांना आव्हान देण्याची मोठी जबाबदारी आमदार प्रणिती शिंदेंवर असणार आहे.

स्वत:च्या मतदारसंघाबरोबरच वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्याचा डाव

‘शहर मध्य’ मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदेंचे पारडे जड आहे. आता राष्ट्रवादीचा अजित पवार गट, शिवसेनेचा शिंदे गट, भाजप, माकप, एमआयएम आणि ‘बीआरएस’च्या उमेदवारांशी त्यांना टक्कर द्यावी लागणार आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा दोनवेळा पराभव झाल्याची खंत देखील त्यांच्या मनात आहे. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी स्वत:चा विधानसभा मतदारसंघ राखून सोलापूर लोकसभेचा खासदार देखील काँग्रेसचाच विजयी व्हावा, यासाठी त्यांनी ठोस प्लॅनिंग सुरू केले आहे

जिल्हाध्यक्ष धवलसिंह कोठे आहेत?

अकलूजचे धवलसिंह मोहिते-पाटील यांना जिल्हाध्यक्ष केल्यास पक्षाची ताकद जिल्हाभर वाढेल, त्यांच्या जनसेवा संघटनेच्या बांधणीचा पक्षाला लाभ होईल, असा पक्षश्रेष्ठीला विश्वास होता. निवडीनंतर सुरवातीला धवलसिंहांनी जिल्हाभर दौरे करीत कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. पण, महागाईसह विविध मुद्द्यांवर शहर काँग्रेस वारंवार आंदोलने करीत असताना वरिष्ठ नेतेमंडळी आल्यावर त्यांच्यासोबत दिसणारे जिल्हाध्यक्ष मात्र त्या आंदोलनांमध्ये दिसत नाहीत. आता ऑक्टोबरनंतर निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल. तत्पूर्वी, शहर-जिल्हा काँग्रेसचे मनोमिलन होऊन विरोधकांना आव्हान देण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्षांवरही तेवढीच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com