

muncipal corporation
solapur
सोलापूर : महिला हॉस्पिटल ते साखर कारखाना असा पाच किलोमीटर सिमेंट काँक्रीट रस्ता करण्यात आला. पण, १५ दिवसांतच आसरा चौकात हा नवाकोरा रस्ता फोडावा लागणार आहे. काम सुरू होण्यापूर्वीच महापालिकेने भूमिगत जलवाहिन्या, पाणीपुरवठ्याच्या मुख्य वाहिन्या आणि ड्रेनेज चेंबर्सची काम पूर्ण करण्यासंदर्भात ‘एमएसआयडीसी’ला लेखी सूचना दिल्या होत्या. त्यानंतर दोन वेळा स्मरणपत्रेही पाठवली, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यामुळे आता रस्ता फोडून जलवाहिनी व ड्रेनेजची कामे करावी लागणार असून, त्यासाठी सुमारे ९ कोटी खर्च होणार आहे.
दीड महिन्यापूर्वी होटगी रोडच्या काँक्रिटीकरणास सुरुवात झाली. एक-दीड महिन्यापूर्वी महापालिकेने ‘एमएसआयडीसी’ला पहिले पत्र पाठविले. त्यानंतर २ जुलै आणि १७ जुलै रोजीही देखील स्वतंत्र पत्रांद्वारे जलवाहिनी क्रॉसिंग, ड्रेनेज चेंबर्स आणि पाणीपुरवठ्याशी संबंधित कामे पूर्ण करायची असल्याची आठवण करून देण्यात आली होती. मात्र, या पत्रांकडे दुर्लक्ष करत ‘एमएसआयडीसी’ने रस्त्याचे काम सुरूच ठेवले. त्यामुळे आसरा चौकातील १८ इंची, २० इंची आणि गोदूताई घरकुल योजनेची मुख्य जलवाहिनी काँक्रीट रस्त्याखाली अडकली आहे. तसेच ड्रेनेजचे १८ चेंबर्सही बुजल्याचे महापालिका व ‘एमएसआयडीसी’च्या संयुक्त पाहणीत स्पष्ट झाले. महिला हॉस्पिटलकडून विमानतळाच्या दिशेने जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला दाट लोकवस्ती, तर मुख्य जलवाहिनी डाव्या बाजूला असल्याने भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी येथे जलवाहिनीचे क्रॉसिंग अपरिहार्य आहे.
वृंदावन पार्क, आसरा, भारतमाता, हत्तुरेवस्ती, शंकरनगरसह १२ ठिकाणी जलवाहिनी क्रॉसिंग अपेक्षित होते. मात्र, त्यासाठी जागा मोकळी न ठेवताच काँक्रिटीकरण करण्यात आले. आता नवा रस्ता खोदून ही कामे करावी लागणार आहेत. महापालिकेने ‘एमएसआयडीसी’सोबत झालेल्या संयुक्त बैठकीत बुजलेली १८ ड्रेनेज चेंबर्स खुली करणे, १२ ठिकाणी जलवाहिनी क्रॉसिंग पूर्ण करणे आणि आसरा चौकातील तीन मुख्य जलवाहिन्यांचे क्रॉसिंग तातडीने करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार संयुक्त पाहणी करण्यात आली. आता ही कामे करण्यासाठी रस्ता फोडला जाणार आहे.
आता करावी लागणारी कामे
आसरा चौकात १८ इंची जलवाहिनीचे क्रॉसिंग
२० इंची जलवाहिनीचे क्रॉसिंग
गोदूताई घरकूल योजनेच्या मुख्य जलवाहिनीचे क्रॉसिंग
रस्त्याखाली बुजली १८ ड्रेनेज चेंबर्स
१२ ठिकाणी नवीन जलवाहिनी क्रॉसिंग
रस्ता फोडूनच कामे करावी लागणार
महापालिका व एमएसआयडीसी विभागाची संयुक्त पाहणी झाली. त्यांना सर्व ठिकाणांची माहिती दिली आहे. साधारण १२ ठिकाणी जलवाहिनी क्रॉसिंग करावे लागणार आहे. त्यासाठी जागा उपलब्ध आहे. परंतु आसरा चौकात तीन मुख्य जलवाहिनी आहेत. त्या रस्त्याखाली बुजल्या गेल्या आहेत. पूर्वकल्पना देऊनदेखील त्यांनी हे काम केले नाही. आता रस्ता फोडूनच काम करावे लागणार आहे.
- व्यंकटेश चौबे, सार्वजनिक आरोग्य अभियंता, सोलापूर महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.