

solapur
sakal
सिद्धाराम पाटील
सोलापूर : सोलापुरातील एका तरुणाचा पहाडी आवाज लोकमान्य टिळकांना भावला. आणि त्यांनी त्याला थेट कोलकत्त्याला नेले ‘वंदे मातरम्’ गाण्यासाठी! सन १९०६ मध्ये म्हणजे १२० वर्षांपूर्वी कोलकत्त्यात काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन भरले होते. त्या व्यासपीठावर सोलापूरच्या या तरुणाने संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गायले. त्या तरुणाचे नाव होते श्रीनिवास नारायण तथा तात्यासाहेब काडगावकर. पुढे त्यांनी आपल्या आवाजातून ‘वंदे मातरम्’ आणि देशभक्तीची गीते सोलापूरच्या घराघरांत पोहोचवली. त्यांच्या या कार्यामुळेच ते पुढे ‘वंदे मातरम् काडगावकर’ या नावाने ओळखले जाऊ लागले. ‘भारताच्या इतिहासात सोलापूरचे योगदान’ या ग्रंथाचे लेखक प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी ही माहिती दिली.
यंदा ‘वंदे मातरम्’ या गीताला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. कोलकत्ता काँग्रेस अधिवेशनात १८९६ मध्ये रवींद्रनाथ टागोरांनी हे संपूर्ण वंदे मातरम् गायले. पुढे १९०५ मध्ये बंगालची फाळणी झाल्यावर वंदे मातरम् हे स्वातंत्र्य आंदोलनाचे प्रभावी प्रतीक बनले. सोलापुरातही हे गीत लोकप्रिय होते. त्यात मोठा वाटा होता श्रीनिवास काडगावकर यांचा.
देशभक्तीसाठी सोडली नोकरी अन्....
श्रीनिवास काडगावकर यांचा जन्म १८६७ मध्ये सोलापुरात झाला. बी.ए.पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर लोकमान्य टिळकांच्या प्रभावामुळे त्यांनी सरकारी नोकरी सोडून स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. वंगभंग आंदोलन काळात कोलकाता येथे वंदे मातरम् म्हटले. १९२९-३०च्या काळात प्रभातफेरी, मोर्चे, मिरवणुका, परदेशी मालावरील बहिष्कार, स्वदेशी चळवळ आणि सभा-संमेलनांत ते सक्रिय होते. त्यांचे पहाडी आवाजातील देशभक्तिपर गीत हे त्या काळातील प्रभातफेऱ्यांचे विशेष आकर्षण होते. स्वातंत्र्यानंतर २ वर्षांनी त्यांचे देहावसान झाले.
प्रत्येक सभेची सांगता ‘वंदे मातरम्’ने...
१९३० मध्ये प्रभातफेऱ्या आणि सभांमध्ये काडगावकरांचा आवाज आंदोलनाला नवी ऊर्जा देत होता. पुढे ब्रिटिशांनी सोलापुरात मार्शल लॉ लागू केला. या आंदोलनात काडगावकरांवर कारवाई झाली. त्यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला, मालमत्ता जप्त केली. त्यांना काही काळ सोलापूरबाहेर जावे लागले. १९४२ ते १९४५ या काळात सोलापुरातील प्रत्येक सभेची सांगता त्यांच्या पहाडी आवाजातील ‘वंदे मातरम्’ने होत असे. धार्मिक वृत्तीचे काडगावकर गायन आणि संगीताचे जाणकार होते. पंढरपूर, गाणगापूर, आळंदी अशा तीर्थक्षेत्रांना ते नियमित भेट देत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.