

Police seized pistol
Solapur sakal
सोलापूर : सोलापूर-विजापूर रोडवरील निशा हॉटेलसमोरील मोकळ्या मैदानात चौघांना लुटणाऱ्यांकडे पिस्टल आणि त्यात चार गोळ्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे. विजापूर नाका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड यांच्या पथकाने दोन दिवस पुण्यात मुक्काम करून या गुन्ह्यातील दोघांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडील पिस्टल जप्त करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलिस कोठडी ठोठावली आहे.
१९ जुलैला पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास तेरामैल येथून जेवण करून चार मित्र विजापूर रोडवरील घराकडे निघाले होते. वाटेतील निशा हॉटेलजवळील मोकळ्या मैदानात लघुशंकेसाठी ते थांबले होते. त्यावेळी पाच दुचाकीवरून दहा जण त्याठिकाणी आले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांना लुटले. एका मित्राला त्यांनी पिस्टलचा धाक दाखवला होता. त्यांना घाबरवून त्यांनी चौघांकडील दोन लाख २५ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला होता.
या प्रकरणी संजय केरबा भडंगे (रा. आंबेडकर नगर, अय्यंगार बेकरीमागे, विजापूर रोड, सोलापूर) यांनी २२ जुलैला विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळले. सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड यांच्या पथकाकडे तपास सोपविण्यात आला. या पथकाने गुन्ह्यातील चौघांना काही तासांत जेरबंद केले. त्यानंतर उर्वरित संशयित आरोपींच्या शोधासाठी पथक पुण्याला रवाना झाले होते. आणखी या गुन्ह्यातील चौघे फरार असून सोनू शेख याच्याकडे चोरलेले दागिने व रोकड आहे. त्यांचा शोध सुरू आहे.
एकावर खुनाचा, दुसऱ्यावर ‘मोक्का’चा गुन्हा
चौघांना लुटणाऱ्या दहापैकी चौघांना यापूर्वीच अटक करण्यात आले आहे. आता दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली असून दोघेही मध्यरात्रीच घरी यायचे. सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड यांच्या पथकाने दोन दिवस पुण्यात (साबळेवाडी, ता. खेड) मुक्काम केला. दोघांवर पाळत ठेवली आणि रात्री घरी आल्यावर त्या दोघांना पकडले. त्यांच्याकडे एक पिस्टल, चार गोळ्या सापडल्या. यातील वैभव साबळे (रा. साबळेवाडी) हा ‘मोक्का’च्या गुन्ह्यातील आरोपी असून किरण सूर्यवंशी (रा. सांगली) हा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. त्याने तुरुंगातच एकाचा खून केला होता, अशी माहिती समोर आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.