

सोलापूर : चोरी, घरफोडी किंवा अन्य गुन्हे घडू नयेत किंवा घडल्यावर आरोपींपर्यंत काही तासांत पोचण्यासाठी सीसीटीव्हींची आवश्यकता असते. मात्र, सोलापूर शहराची सुरक्षा अवघ्या दोन हजार ६८८ सीसीटीव्हींवर असल्याची वस्तुस्थिती पोलिसांकडील आकडेवारीतून समोर आली आहे. शहराच्या हद्दवाढ भागात व महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्हीच नाहीत किंवा अत्यल्प प्रमाणात असल्याचेही त्या माहितीवरून दिसते.
चोरी, घरफोडीसह इतर कोणत्याही गंभीर गुन्ह्याच्या तपासात सर्वांत महत्त्वाचा दुवा म्हणजे सीसीटीव्ही मानला जातो. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हेगारांचा तपास लागणे सोपे होते. त्यामुळे शहराच्या सुरक्षेसाठी प्रत्येक चौकांमध्ये, महत्त्वाच्या सार्वजनिक रस्त्यांवर आणि प्रत्येक व्यक्तीच्या घरासमोर काही हजारांचा सीसीटीव्ही आवश्यक आहे. मात्र, अनेकांच्या घरात लाखांच्या मौल्यवान वस्तू, दागिने, रोकड असते, मात्र त्यांच्या घरासमोर सीसीटीव्ही नसतो अशीही उदाहरणे आहेत. बंद घरांवर लक्ष ठेवून चोरटे त्याठिकाणी डाव साधतात, घरातील ऐवज चोरीला गेल्यावर पोलिसांत धाव घेतात. पोलिस तपास सुरू करतात तेव्हा त्या घरासमोर सीसीटीव्ही नसल्याचे दिसून येते. बाजार समिती, एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्थानक, बॅंका, एटीएम सेंटर, महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये चोरीसह अन्य गुन्हे होऊ नयेत, यासाठी तेथे सीसीटीव्ही आवश्यकच आहेत.
सोलापूर शहराची सद्य:स्थिती
एकूण घरे
२.६२ लाख
अंदाजे लोकसंख्या
१२ लाख
खासगी सीसीटीव्ही
२२०३
शासकीय कॅमेरे
४८५
महापालिकेतर्फे बसविलेले
३३१
‘या’ महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही अत्यल्प
शहरातील बाळे, शेळगी, केगाव, जुळे सोलापूर या हद्दवाढ भागात अजूनही शासकीय यंत्रणांमार्फत सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. तर हैदराबाद रोड, बॉम्बे पार्क, राजस्व नगर, डफरीन चौक, गुरुनानक चौक, रंगभवन, सिव्हिल चौक, सात रस्ता (शासकीय विश्रामगृह), जुना एम्प्लॉयमेंट चौक, सरस्वती चौक, भैय्या चौक, यासह महापालिकेच्या शाळा परिसरात देखील शासकीय यंत्रणांचे सीसीटीव्ही नाहीत. महावीर चौक ते विमानतळ या रोडवर सीसीटीव्ही नाहीत. शहर पोलिसांनी वारंवार आवाहन केले, पण परिस्थिती फारशी बदललेली नाही.
शहरात महापालिकेचे अवघे ३३१ सीसीटीव्ही
सोलापूर शहराची हद्द वाढत असताना किंवा १९९२ मध्ये हद्दवाढ भाग महापालिकेत समाविष्ठ झाला, तेव्हापासून महापालिकेतर्फे लोकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या चौकांमध्ये व रस्त्यांवर विशेषत: हद्दवाढ भागातील परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले नाहीत. शहरातील चोरी, घरफोडीचे प्रकार सर्रासपणे हद्दवाढ भागात, नव्याने वसलेल्या नगरांमध्ये घडत असल्याचे चित्र आहे. स्मार्ट सिटीतून ३३१ कॅमेरे बसविले, पण अजूनही सर्व नियोजित ठिकाणी सीसीटीव्ही दिसत नाहीत. दुसरीकडे महापालिकेच्या ५७ पैकी अवघ्या १२ शाळांमध्येच सीसीटीव्ही लावले गेले आहेत. उर्वरित शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे ५७ लाखांची मागणी केली आहे. पण, अजूनही तो निधी मिळालेला नाही. त्यामुळे सीसीटीव्ही लावण्यात आलेले नाहीत.
गुन्ह्यांच्या तपासासाठी सीसीटीव्हीची मोठी मदत
सोलापूर शहरातील व्यापारी संघटनांनी एकत्रित येऊन दुकानांसमोर, अपार्टमेंट, हौसिंग सोसायट्यांसह प्रत्येकांनी घरासमोर दर्जेदार सीसीटीव्ही बसवावेत. घराकडे, दुकानाकडे ये-जा करणारा रोड त्यात कव्हर होईल अशा ठिकाणी सीसीटीव्ही असावा. जेणेकरून चोरी, घरफोडीसह अन्य गुन्हे करणाऱ्यांवर लक्ष राहील. गुन्हा घडल्यावर आरोपींपर्यंत पोचण्यास पोलिसांनाही मोठी मदत होईल.
- एम. राज कुमार, पोलिस आयुक्त, सोलापूर
शहरातील सात पोलिस ठाणी...
१) फौजदार चावडी
२) सलगर वस्ती
३) जोडभावी पेठ
४) जेलरोड
५) विजापूर नाका
६) एमआयडीसी
७) सदर बझार
सीसीटीव्हीचा कोणता प्रकार दर्जेदार...
१) नाईट मोड : दिवस असो की रात्र, काही ठरावीक अंतरावरील सर्व हालचाली स्पष्टपणे टिपण्याची क्षमता या कॅमेऱ्यात असते. रात्रीच्यावेळी देखील कॅमेऱ्यात बाहेरील सर्वकाही स्पष्टपणे दिसते. घरासमोर लावण्यासाठी याचाच सर्वाधिक वापर होतो.
२) डोम : ठरावीक वेळानंतर हा सीसीटीव्ही ३६० ॲंगलमध्ये सर्व बाजूंनी फिरत असतो. त्या कॅमेऱ्यात आजूबाजूच्या सर्व हालचाली टिपण्याची क्षमता आहे. शहरातील मुख्य चौकांमध्ये असे कॅमेरे लावले जातात.
३) रेग्युलर सीसीटीव्ही : एक महिना, दोन महिन्याचे फुटेज साठविणारे कॅमेरे, दर्जेदार कॅमेऱ्यांच्या तुलनेत फार प्रभावी नाहीत.
सोलापूर शहरात दरमहा १८३ गंभीर गुन्ह्यांची नोंद
सोलापूर शहरातील सात पोलिस ठाण्यांमध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या १२ महिन्यात दरमहा सरासरी १८३ गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात १३१ घरफोड्या आणि ५७८ चोरीचे गुन्हे आहेत. गंभीर गुन्हा घडल्यानंतर पोलिस अधिकारी घटनास्थळी जाऊन पाहणी करतात. त्यावेळी त्यांना त्या ठिकाणच्या किंवा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची मोठी मदत होते. त्याआधारे पोलिस काही दिवसांत गुन्हेगारापर्यंत पोचतात. शहराच्या किंवा स्वत:च्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक चौकात व प्रत्येक घरांसमोर सीसीटीव्ही बसविल्यास त्याची धास्ती गुन्हेगारांना राहील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोलापूर शहर पोलिसांनी मागील १२ महिन्यांत ३३३ घरफोड्यांमधील व ८९ चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद केले आहे. त्यासाठी त्यांना सीसीटीव्हीचा मोठी मदत झाली आहे. परंतु, बाळे-बार्शी रोड, जुळे सोलापूर, शेळगी, दहिटणे, केगाव, अशा परिसरात सीसीटीव्हींची संख्या खूपच कमी असल्याने चोरटे त्यांचा डाव साधण्यात यशस्वी होतात. पोलिस त्यांच्यापर्यंत पोचतात, पण त्यासाठी वेळ लागत असल्याचीही उदाहरणे आहेत. पोलिसांना २०२४ मधील २४५ चोरी आणि ४२ घरफोड्यांमधील चोरटे अजूनही सापडलेले नाहीत. तरीपण, पोलिसांनी गस्त वाढविण्याचे नियोजन केले असून सध्या जवळपास २५० ठिकाणी ‘क्यूआर कोड’ पेट्रोलिंग सुरू आहे. मनुष्यबळाअभावी सर्वच नगरांमध्ये दररोज ठरावीक तासानंतर गस्त अशक्य असल्याने नागरिकांनी घर, दुकानासमोर सीसीटीव्ही लावणे आवश्यक आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०२४मधील गुन्हे
एकूण गंभीर गुन्हे
२,१९९
घरफोडी
५७८
तपास लागलेल्या घरफोडी
३३३
चोरी
१३१
चोरीचे गुन्हे उघड
८९
गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीसीटीव्ही खूप फायदेशीर
सीडीआर, लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज अशा तांत्रिक बाबींवरुन आरोपी, गुन्हेगारांना पकडताना पोलिसांना मोठी मदत होते. प्रशासनाने चौकाचौकात कॅमेरे लावेल, पण प्रत्येक नागरिकांनीही स्वत:हून घरासमोर, रस्त्याच्या दिशेला तोंड करुन सीसीटीव्ही लावायला हवेत. त्या नगरातील प्रत्येकांनी सीसीटीव्ही लावले तर कदाचित त्या भागात चोरी, घरफोडी होणारच नाही. गुन्हा करताना बहुतेक आरोपी सर्रासपणे तोंड बांधून येतात, पण सीसीटीव्ही फुटेज असेल तर त्यातील कोणतरीतरी बाब गुन्हेगांराना पकडण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
- डॉ. दीपाली काळे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.