शिक्षणमधील ‘वायदे बाजार’ कोसळला! शिक्षणाधिकाऱ्यांचे जाणे अनेकांच्या जिव्हारी; झेडपीत महत्त्वाच्या बदलांची शक्यता

प्राथमिक शिक्षणमधील टेबल नक्की चालवतयं तरी कोण? याचे कोडे ना शिक्षकांना उमगले ना खासगी संस्थाचालकांना. काही वर्षांपासून प्राथमिक शिक्षण विभागामधील ‘वायदे बाजार’ अक्षरश: कोसळला आहे. नवीन कोण येणार. आपलं जे ठरलंय त्याचं काय? या प्रश्‍नांना आता तोंड फुटले आहे.
Solapur ZP
Solapur ZPSakal

सोलापूर : जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण गेल्या अनेक वर्षांपासून प्रमाणापेक्षा अधिक चर्चेत आहे. येथून बदलून गेलेले कर्मचारी माहेरवाशिनीसारखे अधून-मधून या विभागात येत असल्याने प्राथमिक शिक्षणमधील टेबल नक्की चालवतयं तरी कोण? याचे कोडे कधी ना शिक्षकांना उमगले ना खासगी संस्थाचालकांना, गेल्या काही वर्षांपासून प्राथमिक शिक्षण विभागात चालणारा ‘वायदे (कमिटमेंट) बाजार’ अक्षरश: कोसळला आहे. नवीन साहेब कोण येणार. आपलं जे ठरलंय त्याचं काय होणार? या प्रश्‍नांना आता तोंड फुटू लागले आहे.

तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार कार्यालयातच लाच घेताना आढळल्यानंतर शिक्षण विभागाकडे बघण्याचा सर्वांचाच दृष्टिकोन बदलला. आपलेच शिक्षक बांधव म्हणून ज्यांची कामे नियमाप्रमाणे व वेळेत व्हायला हवी होती, त्यांची कामे ठराविक मार्गेच पटकन होऊ लागली. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणारे पदस्थापना, आंतर जिल्हा बदली (येणारे व जाणारे), पदोन्नती (मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख), पदस्थापना बदल, वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ, चटोपाध्यायचा लाभ, शिक्षकांचे समायोजन, खासगी शाळांमधील वैयक्तिक मान्यता, शाळा मान्यता, शिक्षक संच मान्यता, आरटीई कायद्यातील मान्यता, ऐच्छिक नकार दिलेल्या समाजशास्त्र विषय शिक्षकांचे जिल्हास्तर समायोजन, आदर्श शिक्षक पुरस्कार, पात्र विज्ञान शिक्षकांना वेतन श्रेणी लागू करणे हे विषय मार्गी लावण्यासाठी शिक्षक, संस्था चालकांनी कमी-अधिक प्रमाणात सामान्य प्रशासन व प्राथमिक शिक्षणचा मेळ घालत पर्यायी मार्ग शोधला होता.

आता आपलं कसं होणार? याची अनेकांना धास्ती

आपल्याच कार्यालयात बदललेली कार्यपद्धती पाहून ग्रामीण भागातील शिक्षक काळ बदललाय म्हणून जाहीरपणे बोलत होते. गपगुमान नवीन कार्यपद्धती आत्मसात करून अनेक वर्षे रखडलेले विषय मार्गी लावत होते. प्रभारी शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी मंगळवारी रात्री प्रभारीचा पदभार सोडल्याने शिक्षण विभागात मोठा धक्का बसला आहे, पदभार सोडणार म्हणून जावीर वारंवार बोलत होते. मंगळवारी, रात्री खरचं पदभार सोडल्याने ‘वायदे बाजारात’ अडकलेल्या अनेकांना आता आपलं कसं होणार? याचीच धास्ती लागली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे रुजू झाल्यानंतर जावीर यांनी सोडलेला पदभार ही सोलापूर जिल्हा परिषदेमधील पहिलीच मोठी घटना आहे. कारभारी बदलले आता त्यांच्यासोबतच शिक्षण विभागातील काही सरदारही येत्या काळात बदलले जाण्याची शक्यता आहे.

झेडपीचे शिक्षण अन्‌ बदनामीचे लक्षण

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण असो की माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या बदनामीत या दोन्ही विभागांचा मोठा वाटा आहे. माध्यमिकला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळाले आहेत, प्राथमिकच्या कारभाराचा गाडा आणखी काही दिवस प्रभारींवरच चालविला जाण्याची शक्यता आहे. झेडपीचे शिक्षण हे बदनामीचे लक्षण मानले जाऊ लागले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांच्या स्वच्छता मोहिमेत या दोन्ही विभागात काही बदल होतात का? याकडे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

बिंदुनामावली सोडविणार अनेक प्रश्‍न

शिक्षक भरती, पदोन्नती, अंतर जिल्हा बदली हे विषय बिंदू नामावलीमुळे रखडले आहेत. सीईओ मनीषा आव्हाळे यांनी बिंदू नामावलीला प्राधान्य दिले आहे. वर्षानुवर्षे अंतर जिल्हा बदलीसाठी सर्व पध्दतीचे प्रयत्न करून थकलेल्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com