

file photo
sakal solapur
तात्या लांडगे
सोलापूर : उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार चंद्रकांत काशिनाथ हेडगिरी (वय ५२) यांना ४० हजार रुपयांची लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सोमवारी (ता. १५) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास पथकाने ही कारवाई केली.
तक्रारदार हा उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाअंतर्गत कार्यरत आहेत. त्यांचा काही दिवसांचा पगार प्रलंबित होता. तो पगार काढून देण्यासाठी नायब तहसीलदारांनी तक्रारदाराकडे ६० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ४० हजार रुपये द्यायचे ठरले. नायब तहसीलदार प्रलंबित पगार काढून देण्यासाठी लाच मागत असल्याची तक्रार ५ डिसेंबर रोजी करण्यात आली होती. तडजोडीअंती ठरलेली रक्कम नायब तहसीलदाराने सोमवारी मागितली होती. शासकीय कामकाज संपून घरी जाण्यापूर्वी सायंकाळी पावणेसात, सातच्या सुमारास कार्यालयातच नायब तहसीलदाराने लाच स्विकारली. त्यावेळी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रविण निंबाळकर यांच्या नेतृत्वातील पथकाने नायब तहसीलदारास त्याच्याच कार्यालयात रंगेहाथ पकडले.
विशेष म्हणजे नायब तहसीलदाराने त्याच्या कार्यालयातच लाच घेतली होती. दुसरी बाब म्हणजे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील नायब तहसीलदाराचे वय सध्या ५२ वर्षे आहे. दरमहा ६० ते ६५ हजार रुपये पगार असताना देखील नायब तहसीलदाराने लाच मागितली आणि कार्यालयातच रंगेहाथ सापडला. त्याच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून त्याला आता उद्या (मंगळवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे.
नोटांना लावली होती पावडर अन्...
तक्रारदाराने नायब तहसीलदार लाच मागत असल्याची तक्रार पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे केली होती. लाच मागणारा वरिष्ठ अधिकारी असल्याने लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी नोटांना ॲन्थासिन पावडर (बुरशीनाशक पावडर) लावली होती. ५२ वर्षाच्या नायब तहसीलदारास लाच घेताना रंगेहाथ पकडल्यावर मी पैसे घेतलेच नाहीत, तक्रारदाराचे माझ्याकडे काम नव्हतेच, असे म्हणून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण, नोटांना लावलेली पावडर नायब तहसीलदाराच्या हाताला लागली होती. ते दिसल्यावर नायब तहसीलदार शांत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.