
Devendra Fadnavis : कसब्यातील विजय मविआचा नाही तर...; राहुल गांधींचं नाव घेऊन फडणवीसांची टीका
मुंबई - पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. कसबा मतदार संघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा विजय झाला. तर चिंचवडमधून भाजपच्या अश्विनी जगताप विजयी झाल्या. मात्र कसब्यातील भाजपच्या पराभवाची चांगलीच चर्चा झाली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लक्षात घ्या, सातत्याने जिंकणारे कधी तरी पराभूत झाले की त्यांच्या पराभवाचीच चर्चा अधिक होते. हे सहाजिक आहे. देशभरात भाजपला यश मिळालं आहे. महाराष्ट्रात दोन्ही जागा निवडून येतील हे अपेक्षित होतं. मात्र कसब्यात चांगले मत घेऊन देखील विजयी होऊ शकलो नाही. मात्र मतांची टक्केवारी २००९ आणि २०१४ पेक्षा अधिक आहे.
दरम्यान कसब्यातील विजय काही महाविकास आघाडीचा विजय नाही. निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराने राहुल गांधींचा फोटो देखील वापरला नाही. त्यामुळे हा विजय रवींद्र धंगेकरांचा व्यक्तीगत आहेत, असं फडणवीस यांनी म्हटलं. वास्तविक सर्व्हेमध्ये धंगेकरांच्या बाजुने कल होता. हा कल कमी होईल, असा अंदाज होता. मात्र तसं झालं नाही, असंही फडणवीसांनी म्हटलं.
चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना ३६ हजार मतांनी विजय मिळाला. काही लोक भ्रम पसरविण्याचा प्रयत्न करतात की, राहुल कलाटे यांच्यामुळे भाजप विजयी झाला. हे सत्य नाही. २०१९ मध्ये प्रयोग करण्यात आला होता की, राहुल कलाटे यांना सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता. तेव्हा देखील त्यांचा पराभव झाला होता. मात्र आता शिवसेनेची हिंदुत्ववादी मतं भाजपला मिळतील, अशी शक्यता होती. त्यामुळेच कलाटेंना उभं केलं गेलं, असा दावा फडणवीसांनी केला.