'ओमायक्रॉनचा एकही रुग्ण देशात नाही; घाबरु जाऊ नका': राजेश टोपे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rajesh tope

'ओमायक्रॉनचा एकही रुग्ण देशात नाही; घाबरु जाऊ नका': राजेश टोपे

मुंबई: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ओमायक्रॉन व्हेरियंटच्या बाबतीत राज्य सरकार काय उपाययोजना राबवल्या जात आहेत, त्याची माहिती दिली आहे. तसेच लोकांनी घाबरुन जाण्यासारखं काहीही कारण नसल्याचं त्यांनी म्हटलंय. आज आपल्या देशात ओमायक्रॉनची एकही केस अस्तित्वात नसून अनलॉक केलेल्या कोणत्याही गोष्टी तातडीने बंद वगैरे करण्याचा विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

हेही वाचा: शाळेची घंटा वाजणार; काय आहे शिक्षण विभागाची नियमावली?

"लक्ष ठेवून आहोत"

त्यांनी म्हटलंय की, ओमायक्रॉनच्या संदर्भात दोन मीटिंग झाल्या. एक टास्क फोर्ससोबत आणि संपूर्ण राज्यातील अधिकाऱ्यांसोबत एक बैठक झाली. या नव्या विषाणूला 'व्हेरियंट ऑफ कन्सर्न' म्हणून घोषित करण्यात आला आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये संपूर्ण डेल्टा व्हेरियंटने बाधित रुग्णांना ओमायक्रॉनने ग्रासलेले आहे. या विषाणूची संसर्गजन्यता अधिक असल्याचं स्पष्ट आहे. त्याचं टेस्टींग आरटीपीसीआरने होऊ शकतं, हे स्पष्ट झालंय. जागतिक आरोग्य संघटना याबाबत अधिक माहिती देत आहे, त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत.

तयारीबाबत दिली माहिती

या विषाणूबाबतच्या पूर्वउपाययोजना काय करण्यात येत आहेत, याबाबत विचारले असता, आरोग्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची भूमिका होती, ज्या बारा देशांमध्ये हा विषाणू आढळला आहे. त्या देशातून येणारी विमाने महाराष्ट्रात बॅन केली पाहिजे. त्यासाठी आपण नागरी उड्डाण मंत्रालयाला कळवू. नाही झालं तर आपण करु. 29 नोव्हेंबरला म्हणजेच आज जाहीर केलेल्या ऍडव्हायझरीमध्ये, या 12 देशांमधून आलेल्या लोकांची टेस्ट केली जाईल, निगेटीव्ह असले तरी त्यांना होम क्वारंटाईन केले जाईल. जे कुणी पॉझिटीव्ह असतील त्यांना कोणत्या टाईपच्या व्हेरियंटने ग्रासलंय त्याचीही टेस्ट केली जाईल. जिनोमिक सिक्वेन्सिंगचे टेस्टींग वाढवावे लागतील, यासंदर्भातही आम्ही तयारीत आहोत.

हेही वाचा: खासदारांचं निलंबन 'स्क्रिप्टेड'; सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर घणाघाती आरोप

"घाबरण्याचं कारण नाही"

पुढे त्यांनी म्हटलंय की, आज मी जनेतला आवाहन करतो की, आज आपल्या देशात ओमायक्रॉनची एकही केस अस्तित्वात नाही. त्यामुळे तुम्ही घाबरु नका. तो फार घातकच आहे, असंही कुठंही सिद्ध झालेले नाहीये. त्यामुळे जे अनलॉक झालेले आहे, ते लगेचच बंद होणार आहे, असं काहीही नाहीये. नियोजित वेळेप्रमाणेच शाळा वगैरे सुरु होईल. आता गरज आहे ती फक्त नेहमीप्रमाणेच कोरोनाची नियमावली पाळण्याची! ती जनतेनं करावी.