शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अर्थसंकल्पात घोषणा नाही

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 February 2019

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यात ‘मुख्यमंत्री सन्मान योजना’ राबवण्याच्या हालचाली काही दिवसांपासून सरकारने सुरू केल्या होत्या. अर्थसंकल्पात अत्यल्प आणि अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रतिवर्ष १२ हजार रुपये इतके अनुदान देण्याचा विचार अर्थविभाग करीत होता. याबाबत मुनगंटीवार यांनी दुजोरा दिला होता. मात्र आज अर्थसंकल्पात याबाबत कोणतीच तरतूद केलेली नाही, हे उघड झाले आहे.

मुंबई - पंतप्रधान कृषी सन्मान योजनेअंतर्गत सध्या दोन हेक्‍टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. मात्र कोडवाहू भागात शेतकऱ्यांकडील धारण क्षेत्र हे सरासरी जास्त असल्यामुळे अशा शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र, याची तरतूद अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्याहंगामी अर्थसंकल्पात केली नाही. यामुळे अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही, हे उघड झाले आहे. 

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यात ‘मुख्यमंत्री सन्मान योजना’ राबवण्याच्या हालचाली काही दिवसांपासून सरकारने सुरू केल्या होत्या. अर्थसंकल्पात अत्यल्प आणि अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रतिवर्ष १२ हजार रुपये इतके अनुदान देण्याचा विचार अर्थविभाग करीत होता. याबाबत मुनगंटीवार यांनी दुजोरा दिला होता. मात्र आज अर्थसंकल्पात याबाबत कोणतीच तरतूद केलेली नाही, हे उघड झाले आहे.

सन २०१५-१६ मध्ये झालेल्या कृषी गणनेनुसार राज्यात एक कोटी ५२ लाख ८५ हजार ४३९ शेतकरी आहेत. कोकण विभागात १४ लाख ८६ हजार १४४ शेतकरी आहेत त्यापैकी अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी संख्या ८४.५० टक्के एवढी आहे. नाशिक विभागात २६ लाख ९४ हजार ४८१ शेतकरी असून, त्यापैकी ७८ टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्पभूधारक आहेत. पुणे विभागात ३७ लाख २३ हजार ६७३ पैकी ८४ टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्पभूधारक आहेत. औरंगाबाद विभागात ३९ लाख ५३ हजार ४०० शेतकऱ्यांपैकी ७९.५० टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्पभूधारक आहेत. अमरावती विभागात एकूण शेतकऱ्यांची संख्या १९ लाख १३ हजार २५८ असून ७३ टक्के अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी अैहेत. नागपूर विभागातील १५ लाख १४ हजार ४८३ शेतकऱ्यांपैकी ७६ टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्पभूधारक गटातील आहेत. राज्यात अत्यल्प आणि अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ८० टक्के म्हणजे जवळपास एक कोटी २० लाख एवढी आहे. इतके शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहेत.

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no announcement in budget for farmers help