esakal | पंढरीत पादुका नेमक्या कशा येणार? हेलिकॉप्टरने की...; आमदार राम सातपुते संतापले
sakal

बोलून बातमी शोधा

There is no decision on how the palanquin will come against the backdrop of Ashadhi vari

आषाढी एकादशी आवघ्या काही दिवसांवर आली आहे. मात्र तरीही पंढरपुरात पालख्या कशा आणायच्या याचे नियोजन झाले नसल्याचे चित्र आहे. ३० जूनला राज्यातील विविध भागातून येणाऱ्या मानाच्या नऊ पालख्या हवामानाचा अंदाज घेऊन विमानाने की हेलिकॉप्टरने आणायच्या या पर्यायांची चाचपणी सुरु असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

पंढरीत पादुका नेमक्या कशा येणार? हेलिकॉप्टरने की...; आमदार राम सातपुते संतापले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : आषाढी एकादशी आवघ्या काही दिवसांवर आली आहे. मात्र तरीही पंढरपुरात पालख्या कशा आणायच्या याचे नियोजन झाले नसल्याचे चित्र आहे. ३० जूनला राज्यातील विविध भागातून येणाऱ्या मानाच्या नऊ पालख्या हवामानाचा अंदाज घेऊन विमानाने की हेलिकॉप्टरने आणायच्या या पर्यायांची चाचपणी सुरु असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. तर आषाढी वारीची परंपरा सुरु ठेवण्यासाठी प्रतिकात्मकरित्या व प्रतिनिधीक स्वरुपात काही महत्त्वाच्या संतांच्या पादुका ज्या परंपरेने विठ्ठल– रुक्मणीच्या भेटीस जातात. त्यांना मर्यादित स्वरुपात व केवळ संतांच्या पादुका एसटी्द्वारे अथवा वाहनाद्वारे आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी श्री क्षेत्र पंढरपुर येथे नेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील चार पालख्यांचा समावेश असल्याचे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे. यामुळे नेमक्या संतांच्या पादुका कशा आणल्या जाणार, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दरम्यान माळशीरसचे आमदार राम सातपुते यांनी सरकारने शब्द पाळत श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुका शिवनेरी बस ऐवजी हेलिकॉप्टरमधून न्याव्यात, अशी मागणी केली आहे.

मोठी बातमी ! गृहमंत्री म्हणाले... मानाच्या नऊ पालख्या हेलिकॉप्टरने येतील पंढरीत

हेलिकॉप्टरने पंढरपुरात आणायच्या या पर्यायांची चाचपणी सुरु

गृहमंत्री देशमुख म्हणाले, पंढरीची वारी ही वारकऱ्यांचे जीवन असून पांडूरंग हा त्यांचा आत्मा आहे. मात्र, कोरोनामुळे यंदा वारी रद्द केल्याने 30 जूनला राज्यातील विविध भागातून येणाऱ्या मानाच्या नऊ पालख्या हवामानाचा अंदाज घेऊन विमानाने की हेलिकॉप्टरने पंढरपुरात आणायच्या या पर्यायांची चाचपणी सुरु आहे. त्याबाबत काही दिवसांत निर्णय होईल. कोरोनाचे वैश्‍विक संकट राज्यावर आले असल्याने वारकऱ्यांनी घरी राहून पांडूरंगाची सेवा करावी. जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही आणि सर्वांचा जीव सुरक्षित राहील. मानाच्या पालख्या हवाई मार्गाने की रस्त्यावरुन येतील, याबाबत राज्य सरकार निर्णय घेणार आहे. वारीसाठी ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना पास दिले आहेत, ते रद्द करावेत. कोणतेही पास वारीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.

संतांच्या पादुका एसटी्द्वारे अथवा वाहनाद्वारे

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, वारीसाठी ज्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना पास दिले आहेत, ते ग्राह्य धरले जाणार नाहीत. आषाढी वारीची परंपरा सुरु ठेवण्यासाठी प्रतिकात्मकरित्या व प्रतिनिधीक स्वरुपात काही महत्त्वाच्या संतांच्या पादुका ज्या परंपरेने विठ्ठल – रुक्मणीच्या भेटीस जातात. त्यांना मर्यादित स्वरुपात व केवळ संतांच्या पादुका एसटी्द्वारे अथवा वाहनाद्वारे आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच  ३० जूनला दशमीला श्री क्षेत्र पंढरपुर येथे नेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे जिल्हयातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी देवाची, जि.पुणे , श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू, ता.हवेली, जि.पुणे, श्री संत सोपानदेव महाराज संस्थान, श्रीक्षेत्र सासवड, ता.पुरंदर, जि.पुणे व श्री संत चांगवटेश्वर देवस्थान,श्रीक्षेत्र सासवड, जि.पुणे या चार पालखी संतांच्या पादुका घेवून परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील याबाबत योग्य ते नियोजन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार इन्सीडेंट कमांडर म्हणून नेमणूका केल्या आहेत. दरवर्षी आषाढी वारीमध्ये संपुर्ण महाराष्ट्रातून मोठया प्रमाणात लाखोंच्या संख्येने भाविक संतांच्या पालखी सोबत पंढरपूर येथे जात असतात. सध्या महाराष्ट्रात मोठ‌्या प्रमाणात कोरोना संसर्गाच्या वाढीस आळा घालणेसाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सर्वसामान्य नागरीकांना व जनतेला होऊ नये यासाठी पायी-पालखी वारी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी देवाची, जि.पुणे करीता उपविभागीय अधिकारी, खेडचे संजय तेली (मो. नं. 9405583799), श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू, ता.हवेली, जि.पुणे करीता महसूल नायब तहसिलदार, हवेलीचे संजय भोसले (मो. नं. 9960171046), श्री संत सोपानदेव महाराज संस्थान, श्रीक्षेत्र सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे करीता निवासी नायब तहसिलदार, दौंडचे सचिन आखाडे (मो. नं. 7875078107), श्री संत चांगवटेश्वर देवस्थान, श्रीक्षेत्र सासवड, जि. पुणेकरीता महसूल नायब तहसिलदार, पुरंदरचे उत्तम बढे ( मो. नं. 9402226218) अशा प्रकारे नुसार इन्सीडेंट कमांडर म्हणून नेमणूका करण्यात आल्या आहेत. नेमणुका करण्यात आलेल्या इन्सीडेंट कमांडर यांनी पादुका प्रस्थान केल्यापासून ते परत प्रस्थानाचे ठिकाणी येईपर्यंत नेमून दिलेल्या पालखी संस्थांच्या सोबत राहणे आवश्यक असून संबंधित उपविभागीय अधिकारी व संस्थानच्या प्रमुखांशी विचार विनिमय करुन पादूकांचा मार्ग निश्चित करावा व सदर पादुका घेवून जाणा-या बसेस पंढरपूर येथे रात्री 11.00 वाजेपर्यंत पोहचतील याबाबत योग्य ते नियोजन करण्यात यावे. प्रवासा दरम्यान दर्शनाला कोणत्याही ठिकाणी बस थांबविण्यात येऊ नये. तसेच संतांच्या पादुकांसोबत जाणाऱ्या सर्व व्यक्तींनी मास्क वापरणे, दोन व्यक्तींमध्ये अंतर राखणे, वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे.  तसेच या पादुकांचे प्रस्थान झालेपासून पंढरपूर येथे पोहचेपर्यंत व परत पंढरपूरहून प्रस्थानाचे ठिकाणी येईपर्यंत सुरक्षित पोहचतील याबाबत जिल्हा पोलिस प्रशासन व जिल्हाधिकारी सोलापूर यांनी नियुक्त केलेल्या विनोद पाटील, श्री रुक्मणीच्या मंदिर समिती, पंढरपूर ( संपर्क क्र. 8408026069) यांच्याशी समन्वय करुन योग्य ते नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले, याबाबतचे वृत्त महाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महासंवाद’वर प्रसिद्ध झाले आहे.

सरकारने दिलेला शब्द पाळावा

माळशिरसचे आमदार राम सातपुते म्हणाले, श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुका शिवनेरी बस ऐवजी हेलिकॉप्टरमधून न्याव्यात व सरकारने दिलेला शब्द पाळावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या आवाहनास वारकरी संप्रदायांने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यावेळी बैठकीत सर्वांसमक्ष अजित पवार यांनी ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पादुका हेलिकॉप्टरने नेऊ असे बोलले होते. या निर्णयामुळे जनतेची चांगली भावना तयार झाली होती. परंतु हेलिकॉप्टरचा शब्द फिरवून संतांच्या पादुका शिवनेरीने न्यायचे ठरले आहे. या निर्णयातून या सरकारची वारकरी सांप्रदायाकडे पाहण्याची व आषाढीवारीकडे पाहण्याची दृष्टी दिसून येते. या निर्णयाचा मी एक वारकरी म्हणून निषेध करीत आहे व सरकारने अजूनही वेळ गेलेली नाही. शिवनेरी ऐवजी हेलिकॉप्टरची सोय करावी. हजारो वर्षाची आषाढी वारीची परंपरा असणारे महाराष्ट्र राज्य आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी या आषाढी वारीचे रूपांतर संतांच्या पालखी सोहळ्यांमध्ये केले होते. तेव्हापासून विविध संतांच्या पालख्या आषाढी वारीसाठी पंढरपूरला येतात. आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्र धर्माचा आविष्कार व वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. सरकारच्या या बदललेल्या निर्णयामुळे वारकरी संप्रदायात तीव्र नाराजी आहे, असे आमदार राम सातपुते यांनी सांगितले.
(संकलन : अशोक मुरुमकर, तात्या लांडगे व सुनिल राऊत)