Breaking ! कोरोनावरील लस ऐच्छिक, पण लस टोचून न घेणाऱ्यांना द्यावे लागणार त्यांचे लेखी मत

तात्या लांडगे
Tuesday, 12 January 2021

16 जानेवारीपासून शुभारंभ; लसीकरण ऐच्छिक
पाच टप्प्यात लसीकरणाचे नियोजन असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचली जाईल. 16 जानेवारीला लसीकरणाचा शुभारंभ होणार असून लसीकरण ऐच्छिक असणार आहे. नोंदणी केल्यानंतर ज्यांना लस टोचायची नाही, ते स्वत: निर्णय घेऊ शकतील. 
- दिलीप पाटील, सहसंचालक, सार्वजनिक आरोग्य, पुणे

सोलापूर : लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. गावनिहाय बुथयंत्रणा कार्यान्वित केली जाणार असून त्याठिकाणी पोलिस, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, आशासेविका, अंगणवाडी सेविकांची नियुक्‍ती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील आठ लाख 13 हजार 289 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचली जाणार आहे. हे लसीकरण ऐच्छिक असणार आहे. मात्र, ज्यांना लस टोचायची नाही, त्यांच्याकडून लेखी स्वरुपात अभिप्राय घेतला जाणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

 

16 जानेवारीपासून शुभारंभ; लसीकरण ऐच्छिक
पाच टप्प्यात लसीकरणाचे नियोजन असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचली जाईल. 16 जानेवारीला लसीकरणाचा शुभारंभ होणार असून लसीकरण ऐच्छिक असणार आहे. नोंदणी केल्यानंतर ज्यांना लस टोचायची नाही, ते स्वत: निर्णय घेऊ शकतील. 
- दिलीप पाटील, सहसंचालक, सार्वजनिक आरोग्य, पुणे

 

कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आता तयार झाली असून 16 जानेवारीला लसीकरणाचा शुभारंभ होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील खासगी व सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचली जाणार असून त्याअंतर्गत कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. पाच टप्प्यात राज्यातील सव्वाकोटी नागरिकांना लसीकरणाचे उद्दिष्टे सार्वजनिक आरोग्य विभागाने ठेवले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर फ्रंटलाईनवर काम करणारे पोलिस, शिक्षक, प्रतिबंधित परिसरात काम करणारे महापालिका व जिल्हा परिषदेचे कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. एका बुथवर किमान 100 व्यक्‍तींना एकावेळी लस टोचली जाणार असून लस टोचल्यानंतर काही दिवस संबंधितांवर वॉच ठेवला जाणार आहे. लसीकरणाच्या टप्प्यानुसार लस टोचणाऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे. परंतु, ज्यांना लस टोचायची नाही, त्यांना लेखी द्यावे लागेल, असे सोलापूर महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, कोरोनावरील प्रतिबंधित लसीकरण 16 जानेवारीपासून सुरु होणार असल्याने 17 जानेवारीला होणारा पल्स पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. मार्चमध्ये पल्स पोलिओचे लसीकरण होणार असल्याचेही सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मनुष्यबळाची कमतरता भासणार असल्याने लसीकरणासाठी प्राथमिक शिक्षकांचीही मदत घेतली जाणार आहे.

पाच टप्प्यात लसीकरण

  • खासगी व सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस
  • दुसऱ्या टप्प्यात शिक्षक, पोलिस, सरकारी नोकदारांचे लसीकरण
  • 50 वर्षांवरील सर्वच व्यक्‍तींना तिसऱ्या टप्प्यात दिली जाणार लस
  • 50 वर्षांखालील को- मॉर्बिड रुग्ण, गरोदर मातांना चौथ्या टप्प्यात लस टोचली जाईल
  • शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना लस टोचण्याचे पाचव्या टप्प्यात नियोजन

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no obligation to vaccinate against coronavirus; Those who do not want to be vaccinated will have to give their written opinion