
राज्यावर पुन्हा भारनियमनाचे संकट; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले संकेत
अकोला : राज्यात पुन्हा एकदा भारनियमनाचे संकट येऊ शकते. एक ते दीड दिवस पुरेल एवढाच कोळसा औष्णिक वीज उत्पादन केंद्रांमध्ये शिल्लक असल्याने उत्पादन वीजेची निर्मिती घटण्याची शक्यता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली.
दोन दिवसांच्या अकोला जिल्हा दौऱ्यावर असलेले ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना विजेच्या भारनियमनाच्या संकटाचे संकेत दिले. ‘‘उन्हाळा सुरू झाल्याने विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्या तुलनेत वीज उत्पादन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक तेवढा कोळसा वीज उत्पादन केंद्रांकडे उपलब्ध नाही. एक ते दीड दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक असल्याने वीज उत्पादनात घट होऊ शकते. वीज उत्पादन घटल्यास राज्यात भारनियमन करावे लागू शकते,’’ असे ऊर्जामंत्री म्हणाले. कोळशासाठी सातत्याने संबंधित यंत्रणांच्या संपर्कात आहोत. मात्र, परिस्थितीत बदल न झाल्यास भारनियमन अटळ असल्याचेही ते म्हणाले.