
यंदा ‘शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी वर्ष’ धोरण राबविणार
मुंबई - गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांचा झालेला अध्ययन ऱ्हास भरून काढत शैक्षणिक गुणवत्तेसाठी निश्चित करण्यात आलेले उद्दिष्ट टप्प्याटप्प्याने साध्य करण्यात येणार आहे. त्यासाठी २०२२-२३ हे ‘शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यादृष्टीने नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.
शैक्षणिक गुणवत्तावृद्धी वर्ष २०२२-२३ अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमांतर्गत शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करणे, सर्व विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत क्षमता विकसित करणे, विद्यार्थ्याची अध्ययन वृद्धी करण्यासाठी राज्य स्तरावरून शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन करून अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करणे यावर भर देण्यात येणार आहे. शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ५ ते २० जुलै २०२२ दरम्यान ‘मिशन झीरो ड्रॉप आउट मोहीम राबवण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत क्षमता विकसित करून अध्ययन वृद्धी साध्य करण्यासाठी पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शालेय कामकाजाचे एकूण तीस दिवस व दोन चाचण्या अशा स्वरूपाचा सेतू अभ्यास परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पायाभूत भाषिक साक्षरता व गणितीय कौशल्य कार्यक्रम राबवणे, शाळापूर्व तयारी कार्यक्रम अंमलबजावणी, नियमित मूल्यमापन योजना, आनंददायी अभ्यासक्रम योजना, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक-अधिकाऱ्यांचा विदेश आणि राज्य अभ्यास दौरा योजना, पूरक अध्ययन साहित्याचा वापर, शाळा सुशोभिकरण, स्वच्छता व अध्ययन समृद्ध शालेय परिसर यासाठी प्रयत्न करणे, ‘मिलाप’ कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना भविष्यातील अनिश्चिततेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी तयार करणे, शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेऊन यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्ह्याचे ‘शिक्षण दूत’ म्हणून गौरव करणे आदी उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे नुकत्याच जारी झालेल्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. उपक्रम राबवण्यासाठी शिक्षण आयुक्त हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील.
शाळापूर्व तयारी होणार
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अंगणवाड्या, बालवर्ग बंद आहेत. त्यामुळे तीन ते सहा वयोगटातील बालकांची शाळापूर्व तयारी होऊ शकलेली नाही. यामुळे राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका-नगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये जून २०२२ मध्ये पहिलीत प्रवेश घेणाऱ्या बालकांचे शाळेतील पहिले पाऊल पुस्तिका, कृतिपत्रिका व आयडिया कार्ड या साहित्याच्या आधारे शाळापूर्व तयारी करण्यात येणार आहे.
Web Title: This Year Policy Will Be Educational Quality Enhancement Year
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..