मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांना येताहेत धमक्‍या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

"तुम्ही अध्यक्ष बदला, नाहीतर बघून घेऊ', अशा शब्दांत काही धमकीवजा फोन आल्याची माहिती कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली. 

औरंगाबाद  -उस्मानाबादेत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, या निवडीनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांना मंगळवारपासून धमक्‍यांचे फोन सुरू झाले आहेत. "तुम्ही अध्यक्ष बदला, नाहीतर बघून घेऊ', अशा शब्दांत काही धमकीवजा फोन आल्याची माहिती कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली. 

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या झालेल्या बैठकीत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाले. या निवडीचे अनेकांनी स्वागत केले होते. मात्र, या निवडीविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. ही निवड झाल्यानंतर मंगळवारपासून 35 पेक्षा जास्त जणांनी फोन केले, तर काही जणांचे कॉल उचलण्यात आले नाहीत. ज्या लोकांनी फोन केले, यामध्ये काही जणांनी धमक्‍याच दिल्या. 

मराठी माणूस, लेखक म्हणून बघा 
राज्य शासनाने मराठी पुस्तकांसाठी 2015 मध्ये जेव्हा शालेय समिती नेमली होती, त्यात फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे तज्ज्ञ म्हणून नियुक्त केले गेले होते. त्यांच्याकडे मराठी माणूस, मराठी लेखक म्हणून बघायला हवे. ज्याप्रमाणे आमदार, खासदारांची झालेली निवड रद्द करता येत नाही, त्याचप्रमाणे अध्यक्ष निवडसुद्धा बदलता येणार नाही. महामंडळाने घेतलेली भूमिका उचित आहे, असेही ठाले-पाटील यांनी नमूद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Threats to the President of Marathi Literature Board