राज्यात साडेतीन लाख विद्युत वाहने! चार्जिंगवर दुचाकी ५४ पैशांत धावते एक किमी; कारला प्रतिकिलोमीटर दीड रूपये खर्च

राज्यात विजेवर चालणाऱ्या वाहनांची विक्री वाढल्याने विजेची विक्री सप्टेंबर २०२२ मध्ये ४.५६ दशलक्ष युनिटवरून जुलै २०२३ मध्ये १४.४४ दशलक्ष युनिट झाली आहे. दहा महिन्यात विजेची विक्री तिप्पट वाढली आहे.
Electric vehicles
Electric vehiclessakal

सोलापूर : राज्यात विजेवर चालणाऱ्या वाहनांची विक्री वाढल्याने विजेची विक्री सप्टेंबर २०२२ मध्ये ४.५६ दशलक्ष युनिटवरून जुलै २०२३ मध्ये १४.४४ दशलक्ष युनिट झाली आहे. दहा महिन्यात विजेची विक्री तिप्पट वाढली आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात नऊ हजारांवर वाहने रस्त्यांवर धावत असून त्यात सहा हजार ७७८ दुचाकी आहेत.

पर्यावरण रक्षणासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन दिले आहे. महाराष्ट्रासाठी विद्युत वाहनांना चार्जिंग सुविधा पुरविण्यासाठी महावितरण नोडल एजन्सी आहे. विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी ‘महावितरण’च्या माध्यमातून चार्जिंग स्टेशन उभारणे अथवा खासगी चार्जिंग स्टेशन उभारणीस मदत करणे, विद्युत वाहनांच्या चार्जिंगसाठी मदत करण्याच्या दृष्टिने मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करणे, विद्युत वाहनांसाठी धोरणात्मक निर्णयास सरकारला मदत करणे अशी विविध कामे केली जातात.

राज्यात महावितरण व खासगी, अशी एकूण तीन हजार २१४ चार्जिंग स्टेशन असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील महावितरणच्या दोन स्टेशनचा समावेश आहे. चार्जिंगवरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आगामी काळात चार्जिंग स्टेशन वाढविण्याच महावितरणचे नियोजन आहे.

चार्जिंगवरील वाहनांमधून किफायतशीर प्रवास

विद्युत वाहनांमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होतेच, पण पैशांची बचत देखील मोठी आहे. पेट्रोलवरील पारंपरिक दुचाकीला इंधनाचा खर्च प्रतिकिलोमीटर सुमारे २ रुपये १२ पैसे येतो. पण, विद्युत दुचाकीला प्रतिकिलोमीटर अवघा ५४ पैशांचा खर्च येतो. पेट्रोलवरील चारचाकी वाहनाला प्रतिकिमी सुमारे ७ रुपये ५७ पैसे खर्च असून विद्युत चारचाकीला प्रतिकिमी अवघा दीड रुपयांपर्यंतच खर्च होतो. तीनचाकी गाडीचा प्रतिकिमी खर्च ५९ पैसे होतो.

राज्यातील विद्युत वाहनांची स्थिती

सन विद्युत वाहने

  • २०१८ ४,६४३

  • २०२२ १,८९,६९८

  • जुलै २०२३ ३,४८,८३८

  • विद्युत बस १३९९

सोलापूर-पुणे ई-बससेवेसाठी २५ गाड्यांची मागणी

सोलापूर विभागाच्या बस डेपोत महावितरणच्या मदतीने चार्जिंग स्टेशनची उभारणी झाली आहे. येथून आता सोलापूर-पुणे बससेवा सुरु होणार आहे. सोलापूर विभागाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे २५ बसगाड्यांची मागणी केली आहे. तेथून बस उपलब्ध झाल्यास काही दिवसांत या मार्गावर बससेवा सुरु होईल, असे विभाग नियंत्रक विनोद भालेराव यांनी सांगितले.आगामी काळात पंढरपूर, मंगळवेढा व अक्कलकोट येथून देखील ई-बससेवा सुरु करण्याचे नियोजन असल्याचेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com