लॉकडाउनमध्येही झाले "एवढे' अपघात : साडेतीन हजार मृत्यू; "या' जिल्ह्यांचा प्रवास ठरला जीवघेणा 

तात्या लांडगे 
Thursday, 17 September 2020

यंदा जानेवारी ते ऑगस्ट या काळात 15 हजार 194 अपघात झाले असून, या अपघातात सहा हजार 791 व्यक्‍तींचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी याच काळात 22 हजार 824 अपघात झाले असून त्यात आठ हजार 910 जणांना जीव गमवावा लागला होता. विशेषत: यंदा लॉकडाउन काळात साडेतीन हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. दुसरीकडे 1 जानेवारी ते 24 मार्च या 83 दिवसांत तीन हजार 207 व्यक्‍तींचा सात हजार 925 अपघातात मृत्यू झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. 

सोलापूर : कोरोनाला रोखण्याच्या हेतूने राज्यात 25 मार्चपासून कडक संचारबंदी लागू झाल्यानंतरही रस्त्यांवरील बेशिस्त वाहतूक कमी झाली नाही. 25 मार्च ते 31 ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात सात हजार 269 अपघात झाले आहेत. या अपघातात तीन हजार 584 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे तीन हजार 697 जण गंभीर जखमी झाले असून एक हजार 729 व्यक्‍तींना किरकोळ दुखापत झाली आहे. पुणे, नागपूर, नाशिक, धुळे, पालघर, सोलापूर, औरंगाबाद, अमरावती, नगर, जळगावसह अन्य काही जिल्ह्यांमध्ये अपघात वाढल्याची चिंता व्यक्‍त होत आहे. 

यंदा जानेवारी ते ऑगस्ट या काळात 15 हजार 194 अपघात झाले असून, या अपघातात सहा हजार 791 व्यक्‍तींचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी याच काळात 22 हजार 824 अपघात झाले असून त्यात आठ हजार 910 जणांना जीव गमवावा लागला होता. विशेषत: यंदा लॉकडाउन काळात साडेतीन हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. दुसरीकडे 1 जानेवारी ते 24 मार्च या 83 दिवसांत तीन हजार 207 व्यक्‍तींचा सात हजार 925 अपघातात मृत्यू झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. नाशिक, सोलापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नगर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अपघात झाले आहेत. लॉकडाउनमध्ये चोरट्या मार्गाने धावणारी बेशिस्त वाहने आणि लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर वाढलेला वाहनांचा वेग, यातून अपघात वाढल्याचे चित्र आहे. अपघाती मृत्यूमध्ये सोलापूर राज्यात चौथ्या क्रमांकावर असून सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गामुळे वाहनांचा वेग वाढल्याचा परिणाम असल्याचेही महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले. 

अपघात कमी करण्यासाठी केले ठोस नियोजन 
महामार्गचे वरिष्ठ पोलिस अधिकारी विजय पाटील म्हणाले, वाहनचालकांनी स्वत:बरोबरच कुटुंबाचा करावा विचार. वाहन चालविताना वेग मर्यादित ठेवणे, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा तर चारचाकी वाहनचालकांनी सीट बेल्टचा वापर करावा; जेणेकरून अपघात होणार नाहीत, झालेच तरी आपला जीव वाचेल. आता वाहनांचा वेग पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र यांत्रिक वाहनांची सोय केली जाणार असून वाहनचालकांमध्ये जागृतीही केली जात आहे. 

अपघात अन्‌ मृत्यूची स्थिती 

 • जानेवारी ते ऑगस्टमधील अपघात : 15,194 
 • अपघातात झालेले मृत्यू : 6,791 
 • प्राणांतिक अपघात : 3,316 
 • गंभीर अपघात : 2,385 
 • किरकोळ अपघात : 993 
 • एकूण जखमी : 5,426 

अपघाताची प्रमुख कारणे... 

 • सुरक्षिततेसाठी वाहनचालक वापरत करीत नाहीत हेल्मेट तथा सीटबेल्ट 
 • वाहनांची वेग मर्यादित ठेवण्याचे जागोजागी फलक असतानाही वाहने सुसाट 
 • दारू पिऊन तथा मोबाईलवर बोलत वेगाने वाहन चालविण्याचे वाढले प्रमाण 
 • रस्त्याच्या विरुद्ध दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांचा दिसेना वचक 
 • रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे तथा खराब झालेले रस्ते अन्‌ सर्व्हिस रोडची दुरवस्था 
 • विनापरवाना हयगयीने वाहन चालविणे, वाहतुकीच्या नियमांची माहितीच नसणे 
 • संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three and a half thousand people died in an accident in the state in Lockdown