

solapur-pune highway
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : पुणे, हैदराबाद, तुळजापूरकडे जाणारी वाहने आणि स्थानिक वाहतूक एकाच मार्गावर आल्याने सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील काही ठिकाणी वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या निर्माण होत आहे. आता या दोन्ही प्रकारच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध होणार आहेत. जुना पूना नाका ते बाळे परिसरात चार नवीन पूल उभारले जात असून, त्यातील तीन पूल ऑगस्टअखेर वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. त्यामुळे स्थानिक वाहतूक महामार्गापासून वेगळी होऊन मुख्य मार्गावरील वाहतुकीचा प्रवास अधिक सुरळीत होणार आहे.
नवीन महामार्ग तयार करताना जुना पूना नाका येथील एका बाजूचा पूल जुना ठेवण्यात आला. तसेच मडकी वस्ती, बाळे आणि परिसरातील स्थानिक वाहतुकीसाठी स्वतंत्र पर्यायी पूल किंवा सर्व्हिस रोडची सुविधा पुरेशी नव्हती. परिणामी, छोट्या अंतरासाठीही स्थानिक वाहनांना महामार्गावर यावे लागत होते. यामुळे महामार्गावरील वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याबरोबरच अपघातांचाही धोका वाढला होता. ही समस्या दूर करण्यासाठी जुना पुना नाका येथील सांडपाण्याच्या ओढ्यावर दोन आणि बाळेजवळील आदिला नदीवर दोन्ही बाजूला दोन, असे चार पूल उभारले जात आहेत. या कामाची निविदा १६ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यासाठी ५१ कोटी ५७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
मुख्य महामार्गावरील ताण कमी होणार
चारही पूल सुरू झाल्यानंतर परिसरातील स्थानिक वाहतूक स्वतंत्र मार्गाने वळवता येणार आहे. त्यामुळे बाळे, मडकी वस्ती किंवा लगतच्या भागातील वाहनांना छोट्या अंतरासाठी मुख्य महामार्गावर येण्याची गरज कमी होईल. दुसरीकडे, पुणे, हैदराबाद, तुळजापूर तसेच सोलापूर शहराच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मुख्य मार्गावर अधिक मोकळीक मिळेल. पर्यायी पूल आणि जोडरस्त्यांमुळे स्थानिक वाहतूक आणि लांब पल्ल्याची वाहतूक यांच्यातील संघर्ष कमी होऊन कोंडी तसेच अपघातांचे प्रमाण घटण्याची अपेक्षा आहे. चारही पूल पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुरळीत होईल, असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक स्वप्निल कासार यांनी व्यक्त केला.
तीन पुलांचे स्टेट्स
१) जुना पुना नाका : सांडपाण्याच्या ओढ्यावरील एक पूल बांधून तयार झाला आहे. त्यावरील रस्त्याचे डांबरीकरणही झाले असून, जुना पुना नाक्यावरील ब्रिजजवळ थोडे काम बाकी आहे. १५ दिवसांत हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.
२) स्मशानभूमीकडील पूल : जुना पुना नाका परिसरातील सांडपाण्याच्या ओढ्यावर दोन्ही बाजूला दोन पूल बांधले जात आहेत. यातील स्मशानभूमीच्या बाजूचा पूल उभारण्यात आला आहे; मात्र, त्याचे बरेच काम बाकी आहे. त्यामुळे हा पूल पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होण्यासाठी ३५ ते ४० दिवस लागतील.
३) आदिला नदीवरील पूल : बाळेजवळील आदिला नदीवर दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड बनवून दोन नवीन पूल उभारण्यात आले आहेत. पुलांची कामे पूर्ण झाली असून, डांबरीकरणही झाले आहे. मात्र, आणखी थोडे काम बाकी असल्याने दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले करण्यासाठी ३० ते ३५ दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.
तीन ब्लॅक स्पॉट होणार कमी
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या चार किलोमीटर अंतरात तब्बल सात ब्लॅक स्पॉट (अपघातप्रवण ठिकाणे) आहेत. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोरील सिंहगड कॉलेज परिसर, केगाव पूल, शिवाजीनगर, बाळे पूल, जुना पूना नाका, मडकी वस्ती आणि बसस्थानक (छत्रपती शिवाजी महाराज चौक) या ठिकाणांचा समावेश आहे. सलग तीन वर्षांत एखाद्या ठिकाणी किमान पाच गंभीर अपघात किंवा दहा जणांचा मृत्यू झाल्यास ते ठिकाण ब्लॅक स्पॉट म्हणून निश्चित केले जाते. मात्र, बाळेजवळील आदिला नदीवरील नवीन दोन पूल आणि जुना पूना नाक्याजवळील सांडपाण्याच्या ओढ्यावरील नवीन दोन पूल वाहतुकीसाठी उपलब्ध झाल्याने यापैकी तीन ब्लॅक स्पॉट कमी होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.