नागपूर - देशात २०२२ च्या व्याघ्र गणनेनुसार राज्यात ४४४ वाघांची नोंद झाली आहे. यापैकी ५० टक्के वाघ हे संरक्षित क्षेत्राबाहेर प्रादेशिक वनक्षेत्रात वास्तव्यास आहेत. उर्वरित ५० टक्के वाघ हे व्याघ्र प्रकल्पात आहेत..वन्यजीव संरक्षित क्षेत्रात वनसंवर्धन व व्याघ्र संवर्धनाकडे विशेष लक्ष दिले जात असल्याने वाघांच्या प्रजननाचा आलेख वाढत आहे. मात्र, वाढत्या संख्येचा परिणाम नैसर्गिक स्थलांतरासाठी आवश्यक असलेले भ्रमणमार्ग नष्ट झाल्याने मानवी संघर्षाच्या रूपात समोर येत आहे. यामुळे वाघ हा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी खलनायक ठरू लागला आहे..वाघांना स्थलांतरासाठी लागणारे मार्ग अनियोजित विकास, जंगलातील खनिज संपत्तीच्या उत्खननाच्या लालसेमुळे नष्ट होत चालले आहेत. त्यामुळे एका मर्यादित क्षेत्रात वाघांची संख्या वाढत आहे. तेथे त्यांचा अधिवास संघर्षही तीव्र झाला आहे. परिणामी, मानव-व्याघ्र संघर्षही वाढत आहे.राज्यातील चंद्रपूर, ब्रम्हपुरी, नागपूर, यवतमाळ अशा जिल्ह्यांमध्ये संरक्षित क्षेत्राबाहेर मोठ्या संख्येने वाघ आढळतात. याउलट गडचिरोली, भामरागड, सिरोंचा, गोंदिया या वनसमृद्ध भागात वाघ फारसे आढळत नाहीत. त्या भागांत भक्ष्य प्राण्यांची संख्या कमी असली तरी, योग्य संरक्षण व संवर्धन केल्यास ती वाघांसाठी उपयुक्त बनवता येऊ शकतात..परंतु, त्या भागांतील खनिज संपत्तीच्या उत्खननाच्या दृष्टीने सरकारचे प्राधान्य असल्याने वाघांसाठी आवश्यक त्या उपाययोजना होत नाहीत. शास्त्रीय संस्थांनी विदर्भातील वाघांचे भ्रमणमार्ग आधीच निश्चित केले आहेत.मात्र, कायद्यात या भ्रमणमार्गांना अधिकृत अधिसूचना देण्याची तरतूद नसल्यामुळे शासन त्यांना मान्यता देण्यात टाळाटाळ करत आहे. या पार्श्वभूमीवर काही स्वयंसेवी संस्थांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे..विदर्भातील वन्यजीव संरक्षित क्षेत्र व बाहेरचे प्रादेशिक वन क्षेत्रात वाघाचे प्रजनन होत असल्याने त्यांची संख्या सतत वाढत आहे. भ्रमणमार्ग अवरुद्ध होत चालले असल्याने एका क्षेत्रातील वास्तव्यात असलेले वाघ तिथेच द्विगुणित होत असल्याने वाघांमध्येही अधिवासासाठी संघर्ष वाढला आहे. वाघांचे दूरगामी संवर्धन आणि संरक्षणासाठी त्याचे नैसर्गिक स्थलांतर होणे गरजेचे आहे. अन्यथा वाघ आपसातच संघर्ष करतील आणि मानव-व्याघ्र संघर्षही गंभीर होईल..राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार वाघाच्या भ्रमणमार्गासंदर्भात अंमलबजावणी करण्यात येत आहे.- एम. श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)‘मुक्ताई भवानी’ संवर्धन क्षेत्र ठरतेय उदासीनतेचे बळीजळगाव - जिल्ह्यामध्ये मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा मिळाला खरा. मात्र, या क्षेत्रात दहा ते बारा पट्टेदार वाघांचे अस्तित्व असल्याने त्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता देण्याचा आग्रह वन्यप्रेमींकडून सातत्याने धरला जातोय..एकीकडे ‘जंगल सफारी’सारखे उपक्रम राबविले जात असताना अल्पकालीन स्वार्थापोटी हा महत्त्वपूर्ण प्रकल्प राजकीय व प्रशासकीय उदासीनतेचा बळी ठरतोय, अशी स्थिती आहे. सातपुड्यातील विस्तृत वनक्षेत्र छत्तीसगड - मध्य प्रदेशपासून ते महाराष्ट्र- गुजरातपर्यंत पसरलेले असून वन्य प्राण्यांचा हा शाश्वत संचार मार्ग आहे..याच क्षेत्रात वाघांची संख्या विपुल प्रमाणात वाढण्याची क्षमता आहे, मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्रात वाघांचे पूर्वीपासून अस्तित्व आहे आणि पश्चिम सातपुडा आणि पुढे सह्याद्री क्षेत्रात वाघ केवळ याच भागातून जाऊ शकतात, हे सिद्ध झाले आहे. संवर्धन क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ १२२.७४० चौरस किलोमीटर आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.