सोलापुरातील दुकानांची वेळ वाढली, हॉटेल, लॉजला परवानगी मिळाली 

प्रमोद बोडके
Thursday, 9 July 2020

सोलापुरातील दुकानांसाठी नियमावली 
दुभाजक नसलेला मुख्य रस्ता पूर्व-पश्‍चिम चालीचा असल्यास दक्षिण बाजूकडील दुकाने सम दिनांकास तर उत्तर बाजूकडील दुकाने विषम दिनांकास सुरू राहतील. मुख्य रस्ता दक्षिण-उत्तर असल्यास रस्त्याच्या पूर्वेकडील दुकाने सम दिनांकास व पश्‍चिम बाजू कडील दुकाने विषम दिनांकास उघडी राहतील. दुभाजक असलेल्या रस्त्यावरील दुकानांसाठी मुख्य चौकातून पूर्वेकडून पश्‍चिमेकडे अथवा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या मार्गाच्या दिशेने पहिले दुकान 1, 3, 5, 7 अशा विषम तारखेस उघडी राहील. दुसरे दुकान त्याच दिशेने 2, 4, 6, 8 या सम तारखेला उघडी राहील अशी सूचनाही महापालिकेने केली आहे. 

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सोलापुरातील लॉज आणि हॉटेल बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरील हॉटेल, लॉज, गेस्ट हाउस इत्यादी निवासाच्या सुविधा पुरवणाऱ्या आस्थापना सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. सोलापूर शहरांमध्ये पूर्वी सुरू असलेल्या दुकानाच्या वेळेतही वाढ करण्यात आली आहे. आता नव्या आदेशानुसार सकाळी 9 ते सायंकाळी सात या वेळेत व आठवड्यातील सातही दिवस दुकाने सुरू ठेवण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. 
लॉज आणि हॉटेलला मान्यता देत असताना 33 टक्के इतक्‍या मनुष्यबळासह या आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवा, विलगीकरणासाठी वापरण्यात येत असल्यास त्याचा वापर आवश्‍यक असल्यास पुढे तसाच चालू ठेवण्यात येणार आहे. या आस्थापनांच्या उर्वरित वापरलेल्या 67 टक्के भागांपैकी काही भाग, पूर्ण भाग विलगीकरणासाठी वापरला जाऊ शकतो. आस्थापनांच्या प्रवेशाच्या ठिकाणी ग्राहकांची थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक आहे. स्वागत कक्षाची जागा अथवा टेबलच्या ठिकाणी संरक्षक काच असावी. रेस्टॉरंटसाठी योग्य सामाजिक अंतर राखण्याची सूचना करण्यात आले आहे. 
मेन्यू कार्ड ऐवजी ई-मेन्यू कार्ड, डिस्पोजेबल पेपर नॅपकीनचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकत्र टेबलावर जेवणाऐवजी पार्सल सेवा अथवा रूम सेवेचा वापर करावा. रेस्टॉरंट केवळ अतिथींना राहण्यासाठी उपलब्ध करावीत. आस्थापनांमधील गेमिंग आर्केडस्‌, मुले खेळण्याचे क्षेत्र, जलतरण तलाव व व्यायाम शाळा बंदच ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मोठ्या सार्वजनिक मेळाव्यांवर हॉटेल आणि लॉज गेस्ट हाउस इत्यादीमध्ये बंदी असणार आहे. तथापि सभागृहातील बैठकीसाठी सभागृहाच्या क्षमतेचा30 टक्के वापर करावा. त्या ठिकाणी जास्तीत जास्त पंधरा व्यक्तींना परवानगी देण्यात यावी अशी सूचनाही करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The time of shops in Solapur increased, hotels and lodges were allowed