किती तरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो..; कविवर्य मर्ढेकरांचा आज जन्मदिवस I B. C. Mardhekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Poet B. C. Mardhekar

मराठी साहित्यविश्वात नवकवितेचे आद्य प्रवर्तक म्हणून परिचित असणारे कविवर्य बा. सी. मर्ढेकर म्हणजे जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्राचे भूषण!

किती तरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो..; कविवर्य मर्ढेकरांचा आज जन्मदिवस

सायगाव / सातारा : मराठी साहित्यविश्वात नवकवितेचे आद्य प्रवर्तक म्हणून परिचित असणारे कविवर्य बा. सी. मर्ढेकर (Poet B. C. Mardhekar) म्हणजे जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्राचे भूषण. एक डिसेंबर या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या साहित्यिक (Marathi Litterateur) कामगिरीचे विशेष स्मरण होत आहे.

मर्ढेकर हे मूळचे सातारा तालुक्यातील मर्ढे गावचे. पुणे-बंगळूर महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यालगतच काही अंतरावर गावाकडे जाणारा रस्ता आहे. महामार्गाच्या पूर्वेला कृष्णा नदी ओलांडून पुढे गेले, की गावात पोचता येते. मर्ढेकरांमुळे या गावाला वलय प्राप्त झाले आहे. मराठी साहित्यातील एक युगप्रवर्तक कवी असा त्यांचा उल्लेख केला जातो. मर्ढेकरांनी कवितेप्रमाणेच कलाविचार, समीक्षा, कादंबरी, नाटक या प्रांतांतही महत्त्वाचे योगदान दिले. मर्ढेकरांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. केल्यानंतर आरंभीला टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून काम केले. पुढे काही काळ इंग्रजीचे प्राध्यापक म्हणूनही ते कार्यरत होते. आकाशवाणीमध्ये केंद्र अधिकारी या पदावरही त्यांनी काम केले.

हेही वाचा: जलमंदिरला कालीचरण महाराजांची भेट; राजमाता कल्पनाराजे, उदयनराजेंशी चर्चा

किती तरी दिवसांत

नाही चांदण्यात गेलो

किती तरी दिवसांत

नाही नदीत डुंबलो

यासारख्या अजरामर कविता लिहिणाऱ्या मर्ढेकरांच्या साहित्यिक कार्याची दखल घेताना शासनाने मर्ढे गावात असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी त्यांचे स्मारक ४८ लाख ७६ हजार खर्च करुन उभारले आहे. सन १९५६/ ६० मध्ये मर्ढेकरांच्या मुळगावी स्मारक बांधण्याची कल्पना मान्यवर साहित्यिकांकडून मांडण्यात आली. सन १९६६ मध्ये सातारा येथे अखिल भारतीय साहित्य संमेलनाप्रसंगी काकासाहेब गाडगीळांच्या अध्यक्षतेखाली मर्ढे येथे स्मारक व राष्ट्रीय महामार्ग आनेवाडी येथे काव्यशिल्प उभारण्याचा ठराव समंत करण्यात आला. यानंतर मर्ढेकरांच्या वहिनी विनाताई मर्ढेकर, विजया राजाध्यक्ष यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला. अखेर सन १९९३ च्या सातारा येथील ६६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात स्मारकाच्या मागणीला पुन्हा गती आली. सन २००० मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले. या जागेवर असणारी गांधी स्मारक निधीची इमारत जमिनदोस्त करण्यात आली. नारळ फुटले पण वाटाण्याच्या अक्षताच वाटण्यात आल्या. वाडःमय अभ्यासक व वास्तू रचनाकर उदयन कुलकर्णी यांनी विजया राजाध्यक्ष, ग्रामस्थ मर्ढेकरप्रेमी यांना सोबत घेऊन पाठपुरावा ठेवला. अखेर सन २०१२ मध्ये हे काम पुर्ण करण्यात आले. हे स्मारक दुमजली आहे. त्यामध्ये तळमजल्यावर कविवर्य मर्ढेकरांचा पुतळा, सभागृह, कार्यालय, ग्रंथालय, षटकोनी आकाराचे शिल्प अशी रचना करण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावर येणाऱ्या या साहित्यिक व पर्यटकांसाठी दोन खोल्यांत भांडारगृह, अभ्यासिका यांचा समावेश आहे. मात्र, हे स्मारक लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे.

हेही वाचा: फँड्रीतल्या 'शालू'ला थेट बॉलिवूडचं तिकीट; राजश्री झळकणार 'या' चित्रपटात

‘‘मर्ढेकरांच्या काव्यातून विज्ञान, यंत्रयुग, निसर्ग, संतविचार यांचे अभ्यासपूर्ण संदर्भ मिळतात. जीवन परिपूर्ण असावे, हे त्यांचं स्वप्न होतं. त्यांचे स्मरण करणे, उपलब्ध काव्यातून मिळालेल्या विचाराने समृद्ध होणे यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे.’’

-रश्मी तुळजापूरकर, पुणे (बा. सी. मर्ढेकर यांची नात)

हेही वाचा: NCP, BJP, काँग्रेससह शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार

‘‘जिल्ह्याचे साहित्यिक भूषण असलेल्या मर्ढेकरांचे दरवर्षी संमेलनाच्या माध्यमातून स्मरण होणे अगत्याचे आहे. त्यांच्या नावे उत्कृष्ट साहित्यकृतीचा सन्मान व्हावा, जिल्ह्यातील साहित्यिकास पुरस्कार दिला जावा, मर्ढेकरांच्या स्मारक इमारतीचे लोकार्पण व्हावे.’’

अजित जाधव, मर्ढे साहित्यप्रेमी

Web Title: Today Is The Birth Anniversary Of Poet Bc Mardhekar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Marathi Poetry
go to top