संपामुळे एसटीला दोन हजार कोटींचा तोटा; एसटी प्रशासनाची माहिती
मुंबई : एसटीचे राज्य सरकारमध्ये (Maharashtra government) विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे (ST Workers Strike) महामंडळाचा तोटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. इतर वेळी एसटीचे दैनंदिन उत्पन्न २२ कोटींचे होते. मात्र, त्यानंतर कोरोना (corona) आणि आता संपामुळे एसटीचे चाक अधिकच खोलवर रुतले असल्याने १७ फेब्रुवारीपर्यंत १६०० कोटींचे नुकसान झाले होते. आता तब्बल दोन हजार कोटींच्या घरात तोटा (two thousand crore loss) गेला असल्याचे एसटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीची राज्यभरातील सेवा ठप्प झाली आहे. राज्य सरकारने खासगी प्रवासी वाहतूकदारांना सध्या राज्य प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. मात्र, त्यांनी मनमानी भाडे वसूल करत प्रवाशांची लूट चालवली आहे. बस चालवण्यासाठीही एसटी प्रशासनाकडे कर्मचारी नाहीत. सध्या काही प्रमाणात एसटीची सेवा सुरू आहे; परंतु उत्पन्नात फार भर पडलेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
एकूण ९२ हजार एसटी कर्मचाऱ्यांपैकी मोजकेच कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहे. संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, असे आवाहन एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी केले आहे.