Tuljapur Yatra : तुळजापुरात भरतात वर्षात तीन यात्रा

महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलस्वामिनी तुळजाभवानी माता. आई राजा उदं उदंचा जयघोष होताच शरीर रोमांचित होते, मनात भक्तिभाव दाटून येतो आणि नकळत मनोमन भक्त नतमस्तक होतो.
Tuljapur Yatra
Tuljapur Yatrasakal

महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलस्वामिनी तुळजाभवानी माता. आई राजा उदं उदंचा जयघोष होताच शरीर रोमांचित होते, मनात भक्तिभाव दाटून येतो आणि नकळत मनोमन भक्त नतमस्तक होतो, अशी तुळजापूरची तुळजाभवानी माता. बालाघाट डोंगर रांगांवर वसलेलं आई तुळजाभवानी मातेचे मंदिर म्हणजे राज्यातील पहिले आणि पूर्ण शक्तिपीठ आहे. वर्षातून इथे तीनवेळा यात्रा भरत असते.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सीमेवरचा धाराशिव जिल्हा. धाराशिवपासून अवघ्या २२ तर सोलापूरवरून ४० किलोमीटर अंतरावर आहे, पूर्ण शक्तिपीठ कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर असलेले तीर्थक्षेत्र तुळजापूर. याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणूनही ओळखले जाते. या तुळजापूरमध्ये बालाघाटाच्या डोंगरावर तुळजाभवानी मातेचे भव्य पुरातन मंदिर. तुळजाभवानी मातेची मूर्ती ही चल आहे.

तसेच, देवीची मूर्ती ही गंडकी पाषाणाची आहे. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कुलधर्म करण्याची पारंपरिक परंपरा आहे. तसेच, प्राचीन इतिहासदेखील आहे. अनेक राजवटीत तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे अस्तित्व पिढ्यानपिढ्या कायम राहिलेले आहे. मातेचे मंदिर हेमाडपंती आहे. बीडच्या ठिगळे घराण्याने देवीच्या कळसासाठी सोने दिल्याचे आजही सांगण्यात येते.

तुळजाभवानी मातेच्या वर्षातून तीन यात्रा प्रामुख्याने होतात. चैत्र पौर्णिमेला चैत्री यात्रा होते. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध पौर्णिमा या कालावधीत तुळजाभवानी मातेचा नवरात्र महोत्सव पार पडतो. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध अष्टमी या कालावधीत देवीचे सप्तशती पाठ तुळजाभवानी मंदिरात होतात. तसेच, अश्विन महिन्यातील दुर्गाष्टमीस पुर्णाहूती सोहळा होतो.

बुरानगरातून मातेची पालखी, तर नगरहून येतो पलंग

अश्विन शुद्ध नवमीस घटोत्थापन होते. तर, दशमीला पहाटे तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन पहाटे पार पडते. बुरानगर येथील भगत कुटुंबीयांकडून आलेल्या पालखीतून तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन होते. सध्याच्या भगत कुटुंबीयांच्या माहितीनुसार तिसावी पिढी तुळजाभवानी मातेची पालखी घेऊन तुळजापुरात येते.

तसेच, नगर येथील गणेश पलंगे कुटुंबीयांसह हुडकाबाईचा पलंग घेऊन येतात. तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन झाल्यानंतर अश्विन शुद्ध दशमी ते अश्विन शुद्ध पौर्णिमा या कालावधीत तुळजाभवानी माता नगर येथून आलेल्या पलंगावर विश्रांती घेते. तसेच, कर्जत येथील कापरेवाडी येथील अंबादास क्षीरसागर, सागर क्षीरसागर या कुटुंबीयांकडे मायमोरताब, तर अर्जुन सुतार यांच्याकडे दिवटी-बुधली तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघनासाठी आणण्याचा मान आहे.

तुळजाभवानी मातेचे प्रमुख तीन उत्सव

तुळजाभवानी मातेचा अश्विन महिन्यात नवरात्रोत्सव होतो. पौष महिन्यात शाकंभरी नवरात्रोत्सव पार पडतो. पौष शुद्ध अष्टमी ते पौष शुद्ध पौर्णिमा या कालावधीत शाकंभरी नवरात्रोत्सव पार पडतो. तसेच, चैत्र पौर्णिमेस तुळजाभवानी मातेची चैत्री पौर्णिमा होते. वैशाखी पौर्णिमेस भाविक परंपरेने दश॔नास येतात.

आषाढ महिन्यातील पौर्णिमेस तुळजाभवानी मंदिरात याज्ञवल्क्य उत्सव होतो. कार्तिक महिन्यात तुळजाभवानी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते. तसेच, फाल्गुन पौर्णिमेस तुळजाभवानी मंदिरात होळी पौर्णिमा साजरी केली जाते. तसेच, दिवाळीत अश्विन अमावास्येस भेंडोळी उत्सव पार पडतो.

उत्पन्नात मोठी वाढ

तुळजाभवानी मातेच्या मंदिरास भाविकांच्या पूजा विधीतून, देणगीतून मोठे उत्पन्न मिळते. व्यावसायिकांचे व्यवसाय, तसेच निवासासाठीच्या धर्मशाळा, लॉजेस यामधून सर्व उत्पन्न बाजारपेठेस मिळते. तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर तुळजापूर शहरातील प्रत्येक घटक आर्थिकदृष्ट्या संपन्न झालेला आहे. अनेक परराज्यातील भाविक येतात, त्यांच्या निवासाची व्यावसायिकांनी येथे सोय केली आहे.

तुळजापूरला जाण्याचा मार्ग

धाराशिव, सोलापूर, बार्शी आणि लातूर येथून दर अर्ध्या तासाला तुळजापूरसाठी एसटीची बससेवा आहे. याशिवाय खासगी वाहनसेवाही आहे. तर, रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी सोलापूर रेल्वेस्थानक नजीकचे आहे. विमानाने येणाऱ्यांसाठी सोलापूर, लातूर विमानतळ जवळचे आहे.

भगवतीने घेतला अवतार

देवीच्या अवतार कथेविषयी स्कंद पुराणातील माहितीनुसार कृत युगात कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूतीने पती बरोबर सहगमन करण्याचा विचार केला. मात्र, त्यांना लहान मूल असल्याने व इतर ऋषीमुनींनी तिची समजूत घातल्याने अनुभूतीने तो विचार थांबवला आणि मंदाकिनी नदीकिनारी ती तपश्चर्या करू लागली.

त्यावेळी कुकर नावाच्या दैत्याने तिच्या तपाचा व पातिव्रत्याचा भंग करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी अनुभूतीने श्री भगवतीचा धावा केला. तिच्या हाकेला ओ देऊन श्री भगवतीने अवतार धारण केला आणि त्या दुष्ट दैत्याचा वध केला. त्यानंतर अनुभूतीच्या विनंतीवरून भगवतीने यमुनाचल (बाला घाट) पर्वतावर अखंड वास्तव्य केले आहे. त्रिगुणात्मक आदिशक्ती महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीच्या त्रिगुणात्मक अंशाचे अधिष्ठान म्हणजे तुळजाभवानी माता समजले जाते.

तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघनासाठी आम्ही अश्विन शुद्ध दशमीस पहाटे पालखी घेऊन तुळजाभवानी मंदिरात येतो. भगत कुटुंबीयांच्या पालखीतूनच तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन होते. तुळजाभवानी मातेस सीमोल्लंघनापूर्वी भगत कुटुंबीयांच्या वतीने पेंड भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात येतो.

- जितेंद्र भगत, तुळजाभवानी मातेच्या पालखीचे मानकरी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com