सहा महिन्यात गमावले 12 वाघ, या जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू, वाचा स्पेशल रिपोर्ट

राजेश रामपूरकर
Saturday, 4 July 2020

वाघ वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असताना वाघांच्या मृत्यूची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. गेल्या सहा महिन्यांत 12 वाघांचा मृत्यू झाला. यात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 7, गडचिरोली दोन, नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या परिसरात एक, गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रातील दोन वाघाचा समावेश आहे. गोरेवाड्यात आणलेला वाघ हा चंद्रपूर जिल्ह्यातीलच होता. यामुळे वन्यजीव संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. यातील सहा वाघांची शिकार झाल्याचे उघडकीस आले आहे.

नागपूर :  मानव-वन्यजीव संघर्ष वाढू लागला असताना आता वाघांच्या वाढत्या मृत्यूनेही राज्याची चिंता वाढली आहे. राज्यात गेल्या सहा महिन्यांत 12 वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली. त्यात सर्वाधिक सात वाघ चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. मध्य प्रदेशात 13 तर महाराष्ट्राने अकरा वाघ या सहा महिन्यांच्या कालावधीत गमावले आहेत. गेल्या पंधरा दिवसांत राज्यात सहा वाघांचा जीव गेला. गेल्यावर्षी या सहा महिन्यांत 12 वाघांचा मृत्यू झाला होता.

वाघ वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असताना वाघांच्या मृत्यूची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. गेल्या सहा महिन्यांत 12 वाघांचा मृत्यू झाला. यात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 7, गडचिरोली दोन, नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या परिसरात एक, गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रातील दोन वाघाचा समावेश आहे. गोरेवाड्यात आणलेला वाघ हा चंद्रपूर जिल्ह्यातीलच होता. यामुळे वन्यजीव संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. यातील सहा वाघांची शिकार झाल्याचे उघडकीस आले आहे.

"व्याघ्रभूमी' म्हणून नागपूरची ओळख आहे. मध्य भारतात सर्वाधिक 70 टक्के वाघ आहे. राज्यात वाघांची संख्या वाढत असताना त्यांचे मृत्यूही वाढते आहे. यामुळेच राज्य सरकारने वाघांना इतरत्र हलविण्याचा विचार सुरू केलेला आहे. आठ दिवसांपूर्वी ब्रह्मपुरी विभागात पाच मानवाचा हल्ला करून ठार मारणाऱ्या वाघाला जेरबंद करून गोरेवाडा येथे आणले होते. त्याची प्रकृती अतिशय उत्तम असताना अचानक आठ दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाच्या शेजारील एका गावात एका वाघिणीसह दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याने राज्य सरकारला पुन्हा आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करण्यात येत आहे.

Video : शेतकरीपुत्राचा आविष्कार, जुगाड टेक्‍नॉलॉजीने शेतमशागत, वाचा सविस्तर...

वाढलेल्या शिकारीचा विषय वन विभागाने गंभीरपणे घेतला आहे. त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. वाघाचे अस्तित्व असलेल्या परिसरात वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली. देशभरात आतापर्यंत 56 वाघ दगावले. त्यात मध्य प्रदेशात सर्वाधिक 13 तर महाराष्ट्र 12 वाघ गमावून दुसऱ्या क्रमांकावर आहे. केरळा सहा, तमिळनाडू पाच, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आसाम, गोवा प्रत्येकी चार तर उत्तराखंडने दोन वाघ गमावले.

"नियम कठोर व्हावेत'
मानवावर कायम हल्ला करणाऱ्या वाघाला त्या जागेवरून पकडा. हल्ला करणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी असलेले नियम थोडे शिथिल करा. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाच्या शेजारील कोंढेगाव येथे वाघांचा परिवार विष प्रयोगमध्ये संपणे ही घटना दुःखदायक आहे. यामुळे वाघाचे अस्तित्व असलेले व वाघांची भ्रमंती होत असलेल्या परिसरात संरक्षण अधिक कडक करणे गरजेचे आहे. वाघिणीच्या मृत्यूमुळे आपण अनेक पिढ्यांना मुकलो. वाघांना रहिवास क्षेत्र कमी पडत असल्याने वाघ आणि मानव यांच्यात संघर्ष वाढत आहे. त्यामुळे जंगलावरील अतिक्रमण, विकासकामांसाठी घेण्यात येणाऱ्या जमिनी, वाघांचे कॉरिडॉर ब्रेक होणार नाही याची काळजी सरकारने घेणे गरजेचे आहे.
नितीन देसाई, संचालक मध्य भारत, वाईल्ड लाईफ प्रोटेक्‍शन सोसायटी ऑफ इंडिया


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelve tigers die Maharashtra State in six months