मोठी ब्रेकिंग ! दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा; एका वर्गात असणार अवघे 20 विद्यार्थी 

3School_20fb.jpg
3School_20fb.jpg

सोलापूर : राज्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग असलेल्या सुमारे 35 हजार शाळांमधील 53 लाख विद्यार्थ्यांचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून भरविले जाणार आहेत. त्यात सोलापूर शहरातील महापालिकेच्या सहा, तर शहरातील उर्वरित 121 शाळांसह जिल्ह्यातील एकूण एक हजार 497 शाळांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा अवघी चार तासच असेल. सकाळी साडेसात ते साडेअकरा किंवा दुपारी दीड ते सायंकाळी साडेपाचपर्यंत तास सुरु ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. एका वर्गात अवघे 20 विद्यार्थी बसविले जाणार आहेत. 

शाळांची वेळ ठरविण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना 
राज्य सरकारच्या निर्णयानुसार 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरु होतील. त्यावेळी मुलांच्या आरोग्याला प्राधान्य दिले जाणार असून सकाळी आणि दुपारच्या सत्रात शाळा भरविता येतील. कोणत्या सत्रात शाळा भरवायची त्याचा अधिकार संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना असेल. 
- अशोक भांजे, विस्ताराधिकारी, सोलापूर 


राज्यात फेब्रुवारीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सावध पवित्रा घेत राज्य सरकारने नववी ते बारावीपर्यंतचेच वर्ग भरविण्याचे नियोजन केले आहे. शाळेत दाखल होणाऱ्या मुलांच्या पालकांचे संमतीपत्र त्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. दुसरीकडे मुलांचे वर्ग एक दिवसाआड भरणार असून त्यात आज शाळेत आलेल्या मुलाला दुसऱ्या दिवशी सुट्टी दिली जाणार आहे. त्यात इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांना प्राधान्य दिले जाणार आहे. शाळांमधील शिक्षक व शिक्षकतेर कर्मचाऱ्यांची 'आरटीपीसीआर' ही कोरोना टेस्ट केली जाणार असून विद्यार्थ्यांसह शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांच्या तापमान व ऑक्‍सिजन लेव्हलची दररोज नोंद ठेवली जाणार आहे. पालकांची संमती असल्याशिवाय विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जाणार नसल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

शाळा सुरु करताना.... 

  • सकाळी साडेसात ते साडेअकरा किंवा दुपारी दीड ते सायंकाळी साडेपाच या वेळेत भरणार वर्ग 
  • एका वर्गात आता 40-50 ऐवजी असतील अवघे 20 विद्यार्थी 
  • दरदिवशी मुलांना मिळणार एक दिवसांची सुट्टी; दररोज चार तासच होणार अध्यापन 
  • गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांच्या अध्यापनावर राहणार सर्वाधिक भर 
  • सोलापूर जिल्ह्यातील एक हजार 497 शाळांमध्ये नववी ते बारावीपर्यंत दोन लाख 52 हजार विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com