
सोलापूर : देगाव येथील बसवेश्वर नगरातील अनुराग तिप्पण्णा राठोड (वय १३) या विद्यार्थ्याचा स्कूल बसमधून पडून मृत्यू झाला आहे. बसमधून खाली पडल्यावर त्याच्या डोक्यावरून चाक गेले आणि अनुराग जागीच ठार झाला. अनुराग राठोड हा कवठे येथील संत गाडगेबाबा प्राथमिक आश्रम शाळेत इयत्ता आठवीत शिकत होता. तर दुसऱ्या घटनेत सोलापूर शहरातील कोनापुरे चाळीतील राजनंदिनी कांबळे हिचा शॉक लागून मृत्यू झाला. ती हरिभाई देवकरण प्रशालेत इयत्ता नववीत शिकत होती.
देगाव ते बेलाटी रस्त्यावर मंगळवारी (ता. ८) दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काही वेळाने सलगर वस्ती पोलिस घटनास्थळी आले. पोलिसांनी बसचालक व मदतनीस या दोघांना ताब्यात घेऊन बससह पोलिस ठाण्यात आणले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला, त्यावेळी रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती.
काहींनी मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी सुरुवातीला भूमिका घेतली. त्यावेळी सहायक पोलिस निरीक्षक स्वरांजली खामकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार दोषींवर निश्चितपणे कायदेशीर कारवाई होईल, चालक ताब्यात असल्याचे सांगून विश्वास दिल्याने नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार पार पाडले. दरम्यान, स्कूल बसमधून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक होत असताना देखील ना आरटीओ ना वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते, हे विशेष.
१) प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे असे...
अपघातग्रस्त स्कूल बसची क्षमता ५० प्रवाशांची असताना देखील मंगळवारी त्या बसमधून सुमारे ९० ते १०० विद्यार्थी होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. गर्दीमुळेच तो विद्यार्थी खाली पडला आणि त्याच गाडीच्या चाकाखाली आला.
-------------------------------------------------
२) पोलिस म्हणतात...
अपघातानंतर घटनास्थळी गेल्यावर बसमधील उर्वरित विद्यार्थ्यांकडे विचारपूस केली. त्यावेळी स्कूल बसमध्ये मंगळवारी नेहमीपेक्षा कमीच विद्यार्थी (२५ विद्यार्थी) प्रवास करत होते, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. बसमधील उपस्थिती नोंदवहीवरूनही तसेच दिसते.
दरवाजा उघडल्याने विद्यार्थी खाली पडला
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडणाऱ्या स्कूल बसचा चालक विद्यार्थ्याच्या घराजवळील थांबा आल्यावर बसचा दरवाजा उघडायचा. अनुराग राठोडचा थांबा जवळ आला होता, तत्पूर्वी बसचा दरवाजा हलका उघडला गेला आणि त्यातून तो खाली पडला. त्याचे डोके बसच्या मागच्या चाकाखाली आले आणि क्षणात बसमध्ये मित्रांसोबत गप्पा मारणारा अनुराग कायमचा निघून गेला.
---------------------------------------------------------------------
मोलमजुरी करणाऱ्या आईचे स्वप्न अधुरेच
अनुरागला एक भाऊ, दोन बहिणी असून एक बहीण दिव्यांग आहे. अनुराग शिक्षणात हुशार होता, पण कौटुंबिक स्थितीमुळे त्याच्या आईने त्याला कवठे येथील आश्रमशाळेत घातले होते. सध्या परीक्षा सुरू होती, काही दिवसांत परीक्षा संपून उन्हाळा सुटी लागणार होती. त्यापूर्वीच अनुरागचा अपघाती मृत्यू झाला. अनुरागची आई ट्रॅक्टरवर मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवते. त्याचे वडील गंभीर आजारी असल्याने अंथरुणातच पडून आहेत. अनुराग शाळेत हुशार असल्याने तो मोठा अधिकारी बनेल, नोकरीला लागल्यावर कुटुंबाची परिस्थिती पुढे सुधारेल, हे त्याच्या आईचे स्वप्न अधुरेच राहिले.
शॉर्ट सर्किटमुळे नववीतील राजनंदिनीचा मृत्यू
हरिभाई देवकरण प्रशालेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या राजनंदिनी अणय कांबळे (रा. कोनापुरे चाळ) हिचा घरातील जिन्यावरुन वरच्या खोलीत जात असताना शॉक लागून मृत्यू झाला आहे. शॉक लागल्यावर कुटुंबियांनी तिला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण करंट सुटला नाही. डोळ्यादेखत तिचा जीव गेला. मंगळवारी (ता. ८) सायंकाळी साडेसहानंतर वादळ सुटले होते, अवकाळी पाऊसही सुरू होता. राजनंदिनी घराच्या वरच्या मजल्यावरील तीन लहान मुलांकडे निघाली होती. घराच्या जिन्याच्या पहिल्याच पायरीवर तिने पाय ठेवला आणि तिला शॉक बसला. सर्व्हिस केबलचा शॉक असल्याने तिला स्वत:ची सुटका करून घेता आली नाही. तिच्या घराच्या वरील खोलीत तीन चिमुकली होती, सुदैवाने त्यांना काही झाले नाही. राजनंदिनीला एक भाऊ असून तो इयत्ता अकरावीत असून तिची लहान बहीण सातवीत शिकत आहे. त्यांची आई मजुरी करुन त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवते. त्यांच्या घरावर मंगळवारी काळाने घाला घातला आणि शॉक लागून राजनंदिनीचा मृत्यू झाला.
अर्ज करूनही ‘एमएसईबी’कडून दखल नाही
घरगुती कनेक्शनवरुन सहा-सात जणांना वीज कनेक्शन दिले असून त्याठिकाणी चिकटपट्टी देखील लावलेली नाही. त्यावर ‘एमएसईबी’च्या कार्यालयाकडे अनेकदा अर्ज केले, पण त्याची दखल अधिकाऱ्यांनी घेतली नाही, असा आरोप राजनंदिनीच्या घराशेजारील काशिनाथ कुरघोटकर यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.