
Udayanraje Bhosale : तुमची लायकी आहे का? शिवरायांबद्दल वादग्रस्त बोलणाऱ्यांना उदयनराजेंनी सुनावलं
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात अनेक लोक कल्याणकारी निर्णय घेतले. त्यांनी लोकशाहीची चौकट तयार केली. कारण, लोकांचा राज्य कारभारामध्ये सहभाग असावा आणि त्यातूनच मग लोकशाहीची निर्मिती झाली, असं स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी व्यक्त केलं.
आज जगात अनेक देश आहेत, जिथं आपल्याला राजेशाही पहायला मिळते. पण, लोक त्या संपूर्ण प्रक्रियेत आले पाहिजेत म्हणून, छ. शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाची संकल्पना मांडली. कोणत्याही जाती-धर्मात मतभेद केले नाहीत. सर्वांना एकत्र ठेवण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं, असंही उदयनराजे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) विचारांचा विसर पडल्यामुळं देशाचे अनेक तुकडे झाले आहेत. आपण खोलवर या सगळ्याचा विचार केला पाहिजे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर बोलताना उदयनराजे म्हणाले, जसं राष्ट्रपती देशाचा प्रमुख असतो, तसा राज्यपालही राज्याचा प्रमुख असतो. अशा महत्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी महापुरुषांबद्दल जबाबदारीनं वक्तव्य करणं अपेक्षित आहे. महापुरुषांबद्दल वाईट बोललं तर लोकांच्या भावना दुखावल्या जातात. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होतो. हे कशा करता? जगात अनेक महाराजे होऊन गेले, पण शिवाजी महाराज आणि त्यांच्यात मोठा फरक होता. तो म्हणजे, ते महाराजे स्वत:च्या साम्राज्याठी लढले आणि आपल्या शिवाजी महाराजांनी युध्द केलं ते लोकांसाठी केलं.
महापुरुषांबद्दल बोलण्याची त्यांची विचारांची व्याप्ती संकुचित आहे. शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशाला आपलं कुटुंब मानलं. मात्र, आता अलीकडच्या काळात काही लोकांमध्ये अहंकार निर्माण झालाय. स्वत:चं व्यक्तीमत्व नसताना ते वाढवण्याचं काम करत आहेत. एक ते भगत सिंग होते, ज्यांनी देशासाठी प्राण पणाले लावले आणि दुर्दैवानं सांगावं वाटतं हे भगत सिंह (राज्यपाल भगतसिंह कोश्यारी) आहेत. असं म्हणत उदयनराजेंनी भगत सिंग यांचा दाखला देत राज्यपाल कोश्यारींचा चांगलाच समाचार घेतला.