सत्ता आहे म्हणून तिकडे जाणे योग्य नाही : उदयनराजे भोसले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

सत्ता भाजपाकडे आहे म्हणून तेथे जाणेही योग्य नाही,’ असे मत उदयनराजेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सातारा येथे व्यक्त केले.

सातारा : रविवारी भाजपा प्रवेशाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ‘मागील अनेक दिवसांपासून भाजपाचे लोक पक्ष प्रवेशासाठी माझ्या मागे लागले आहेत. भाजपाची वाटचाल सध्या जोरात सुरू आहे. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, भाजपाच्या एकंदरीत कामामुळे सर्वसामान्य लोक त्रासले आहेत. कामगारांच्या नोकऱ्या जात आहेत कंपन्या बंद पडत आहेत.

दरम्यान, गेल्या चार-पाच वर्षात साताऱ्यात विकास कामे झाली. परंतु सर्वांनी पाठिंबा दिल्यामुळेच मी टिकलो. मागील काळात आडवा पाणी जिरवा असे राजकारण झाले. ईव्हीएम मशीन बाबत मी बोललो परंतु बाकीचे कोणी बोलले नाही. सत्ता भाजपाकडे आहे म्हणून तेथे जाणेही योग्य नाही,’ असे मत उदयनराजेंनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

भाजपा प्रवेशाबाबत उदयनराजे द्विधा मनस्थितीत आहेत. उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशाबाबत कार्यकर्त्यांमध्ये दुमत असले तरी उदयनराजे जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असे कार्यकर्त्यांनी उदयनराजे यांना सांगितल्याचे समजते. तर भाजपामध्ये प्रवेश करणार की नाही याबाबत दोन दिवसात अंतिम निर्णय घेऊ असे उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. तसेच राष्ट्रवादीबद्दलची नाराजीही उदयनराजेंनी यावेळी बोलताना व्यक्त केली. ‘मध्यंतरी माझ्यावर गुन्हे दाखल झाले. त्यात खंडणीचा गुन्हाही दाखल करण्यात आला. हे सर्व होत असताना राष्ट्रवादीचे नेते काही बोलत नव्हते. पक्षातील कोणीही मला विचारले नाही. असे असताना राष्ट्रवादीबरोबर कशासाठी राहायचे. जर राष्ट्रवादी नेत्यांना आवर घालत नसेल तर मी काय समजायचे?’ असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित करत बदल झाला पाहिजे अशी भूमिका कार्यकर्त्यांसमोर मांडली.

दरम्यान, अनेक कार्यकर्त्यांनी उदयनराजेंना सबुरीचा सल्ला देत आत्ताच पक्षांतर करू नये असा सल्ला दिला. ‘आत्ताच भाजपामध्ये प्रवेश करावा असे काही नाही. आपण १४ सप्टेंबर पर्यंत निर्णय घेऊ शकतो अजून तेरा दिवस आहेत तुम्ही सांगाल तो निर्णय घेऊ. मंगळवारी सायंकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांचा फोन येईल त्यांच्याशी बोलणे करून पुन्हा आपण पुन्हा एकत्र बसू आणि निर्णय घेऊ’ असे उदयनराजेंनी सांगितले.

यावेळी बोलताना उदयनराजेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला कमी मते मिळाल्याबद्दलची चिंता बोलून दाखवली. ‘सातारा शहरात अनेक विकास कामे झाली परंतु मला तेवढे मतदान झाले नाही. निर्णय घ्यायचा झाला तर राजीनामा दिल्यानंतर पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल मुळात आताच्या निवडणुकीत माझे मताधिक्य कमी झाले आहे. तसा तो पराभवच आहे. त्यामुळे सर्वांनी आत्मपरीक्षण करावे आणि निर्णय घ्यायला हवा’ असं मत उदयनराजेंनी व्यक्त केलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: udayanraje bhosale talks with supporters about joining bjp