उदयनराजेंचं ठरलं; भाजपप्रवेशाबाबत घेतला मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 September 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा आपला निर्णय बदलत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा आपला निर्णय बदलत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (ता.१४) भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर चर्चा करून राजीनामा दिल्यानंतर रविवारी साताऱ्यात येणाऱ्या महाजनादेश यात्रेत ते समर्थकांबरोबर भाजपात प्रवेश करतील, असे त्यांच्या साताऱ्यातील जवळच्या समर्थकांकडून समजत आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून उदयनराजे हे राज्यातील सर्वात अनप्रिडीक्टड राजकारणी ठरत आहेत. त्यांच्या मनात काय चालले आहे, याचा अंदाज बांधणे कठीण बनले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आल्यावर अवघ्या काही महिन्यातच त्यांचा सूर बदलला. त्यांनी काही दिवसांपूर्वी मूख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे पंधरा दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशवरून रान उठले आहे. आज जाणार, उद्या जाणार, लोकसभेबरोबर विधानसभा होणार नसल्याने थांबले, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विरोध असल्याने प्रवेश राखडलाय, भाजप त्यांना खेळावते आहे, अशा अनेक बातम्या येत राहिल्या. मात्र उदयनराजे काहीच स्पष्ट करत नव्हते. जणू पाण्यात वेगवेगळे खडे टाकून तरंग काय उठतायत याचे ते निरीक्षण करत होते. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय अवकाशात अस्वस्थता आहे.

काल रात्री अचानक ते पक्षाध्यक्ष शरद पवार यांना भेटणार असल्याची बातमी बाहेर आली. त्यानुसार ते आमदार शशिकांत शिंदे व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या सोबत शरद पवार यांना भेटलेही. बैठकीत काय झाले माहित नाही. पण, त्यानंतर उदयनराजेंच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या. ते राष्ट्रवादीतच राहणार असे वाटत असताना पुन्हा भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांनी वेग घेतला. सायंकाळपर्यंत त्यांचा भाजपप्रवेशाचा निर्णय अंतिम झाल्याची माहिती सूत्रांकडून बाहेर येऊ लागली. 

उदयनराजे शनिवारी दिल्लीत जाऊन खासदरकीचा राजीनामा देतील. रविवारी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा साताऱ्यात येणार आहे. या यात्रेतच ते आपले समर्थक, सर्व नगरसेवक, जिल्हा व पंचायत समिती सदाश्यांसह भाजपमध्ये प्रवेश करतील असे जवळच्या समर्थकांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje Bhosale will Join BJP on 14th September