राष्ट्रवादीला मोठा दणका; तीनही राजे भाजपवासी?

राष्ट्रवादीला मोठा दणका; तीनही राजे भाजपवासी?

मुंबई : राष्ट्रवादीचे बाहुबली नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली. पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे उदयनराजे यांचे म्हणणे असले, तरी ते भाजपमध्येच जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना हा मोठा धक्का असणार आहे. या चर्चेमुळे जिल्ह्यात विधानसभेबरोबर लोकसभेची निवडणूकही होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

आजच चार वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पश्‍चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्या वेळी उदयनराजे हजर नव्हते; परंतु शरद पवार यांच्या बैठकीनंतर उदयनराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. पहिल्या टप्प्यातील चर्चेनंतर रात्री साडेआठला पुन्हा दुसऱ्यांदा चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे उदयनराजेही भाजपमध्ये जाणार या चर्चा जिल्ह्यासह राज्यात सुरू झाल्या आहेत.

उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांचे खात्रीशीर म्हणणे आहे. त्यांचा हा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी मोठा धक्का असणार आहे. त्याचा संपूर्ण राज्याच्या राजकारणावर परिणाम होऊ शकतो. या भेटीमध्ये भाजप प्रवेश कसा करता येईल, याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. कारण राष्ट्रवादीत खासदार असताना भाजपमध्ये प्रवेश करता येत नाही. यासाठी काही मार्ग आहे का, यावरही चर्चा झाल्याचे समजते. या वेळी सुनील काटकर, दत्ता बनकर, संग्राम बर्गे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पूरपरिस्थितीवरील चर्चेआडून उदयनराजे यांनी भाजप प्रवेशाचा मार्ग सोपा करण्याची रणनीती मुख्यमंत्र्यांसोबत तयार केल्याचेही सांगितले जात आहे. त्यानुसार नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीत लवकरच ते भाजप प्रवेश करणार आहेत. लोकसभेचा राजीनामा देऊन त्यानंतर लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत एकत्रित घेण्याची उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याचे संपर्कसूत्रांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, या भेटीबाबत उदयनराजे यांच्याशी संपर्क साधन्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन उचलला नाही. त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या निकटच्या कार्यकर्त्यांनी मात्र पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे सांगितले. पूरग्रस्तांना जास्तीतजास्त मदत मिळावी, या आशयाचे निवेदन उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले, असे त्यांनी नमूद केले. 

दरम्यान, उदयनराजे हे सध्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत. त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायचा असल्यास पक्षांतरबंदी कायद्यामुळे खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे उदयनराजे राजीनामा देऊन विधानसभा निवडणुकांबरोबर लोकसभेच्या निवडणुकीला पुन्हा सामोरे जाणार का, हा प्रश्‍न अद्याप तरी अनुत्तरित आहे. 

सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर पूर्णत: वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीपासून धक्‍क्‍यावर धक्के बसू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघातील मताधिक्‍य मागील निवडणुकीपेक्षा निम्म्याने कमी आले. माढा मतदारसंघाचा भाग असलेल्या जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये भाजपला मताधिक्‍य मिळाले. राष्ट्रवादीतील मातब्बर नेते, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे उदयनराजे यांच्याबरोबर मतभेद होते. त्यामुळे लोकसभेला उदयनराजेंची उमेदवारी डावलली जावी, अशी त्यांची अपेक्षा होती. ती पूर्ण न झाल्याने दोघेही नाराज होते. त्याचा परिणाम म्हणून शिवेंद्रसिंहराजेंनी आमदारकीचा राजीनामा देत नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. रामराजेही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

अशा सर्व परिस्थितीत लोकसभा निवडणुकीनंतर उदयनराजेंनी ईव्हीएमच्या मुद्‌द्‌यावरून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्यानंतर शिवेंद्रसिंहराजेंचा भाजप प्रवेश व रामराजेंच्या प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, उदयनराजेंनी त्यावर कोणत्याच प्रतिक्रिया दिल्या नव्हत्या. तेव्हाच जिल्ह्यातील राष्ट्रवादी जनांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. 

शिवेंद्रराजेही "वर्षा'वर 
खासदार उदयनराजे यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या भेटीनंतर त्यांचे चुलतबंधू आणि नुकताच भाजप प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही रात्री दहाच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी "वर्षा'वर दाखल झाले होते. त्यांच्याशी संपर्क साधला असता, मुख्यमंत्र्यांनी मला भेटीसाठी बोलावले असल्यामुळे मी वर्षा बंगल्यावर दाखल झालो आहे. रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. उदयनराजेंच्या उपद्रवाचे कारण देत शिवेंद्रसिंहराजे यांनी दोन आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजप प्रवेश केला आहे. 

...तर राष्ट्रवादी तिन्ही राजे गमावणार 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि उदयनराजे भोसले यांचे बंधू शिवेंद्रसिंहराजे यांनी आमदराकीचा राजीनामा देऊन याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हेही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. आता उदयनराजेंनीही भाजपची वाट धरल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसवर हे तिन्ही राजे गमावण्याची वेळ येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com