
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पक्ष आणि चिन्ह काढून घेण्याच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने रणशिंग फुंकले आहे. आयोगाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Uddhav Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त करा
मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पक्ष आणि चिन्ह काढून घेण्याच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने रणशिंग फुंकले आहे. आयोगाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयासमोरील प्रकरणातील गुंतागुंत वाढवण्यासाठी आयोगाने घाईने निर्णय दिला. वादग्रस्त निर्णय देणारा निवडणूक आयोग बरखास्त करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. शिवसेना भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. निवडणूक आयोगाच्या आय़ुक्तांच्या नेमणुकीवरही उद्धव ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आमचे १६ आमदारांच्या पात्रतेच्या याचिकेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. अशावेळी निवडणूक आयोगाला कशाची घाई होती ? असेही उद्धव ठाकरे म्हणाले. प्रत्येक कार्यकर्त्याकडून स्टॅम्प पेपरवर शपथपत्र सादर करण्यास आयोगाने सांगितले. पण निवडणूक आयोगाने मात्र प्रतिनिधींच्या संख्येवर निर्णय दिला आहे. मग आम्हाला खटाटोप करायला का सांगितला ? असा सवाल ठाकरेंनी केला. आम्ही भर पावसातही लाखो प्रतिज्ञापत्रे ही टेंपोने दिल्लीला पाठवली. या प्रतिज्ञापत्रांवर बोगस असल्याचाही आरोप झाला. त्यानंतर एका सुरक्षा यंत्रणेकडूनही ही प्रतिज्ञापत्रे तपासण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आमदारांच्या पात्रतेची याचिका दाखल असताना आयोगाकडून घाईत हा निर्णय घेण्यात आला. महत्वाचे म्हणजे भाजपकडून तातडीने निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नेमणूक करत हा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग बरखास्त करून आयुक्तांचीही नेमणूक निवडणूक घ्यावी असेही उद्धव ठाकरे म्हणाले. जर राजकीय पक्षात लोकशाही असू शकते, तर निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या नेमणुकीतही लोकशाही असावी, असा दावा त्यांनी केला.