Thackeray Vs Shinde : आसनव्यवस्था 'प्रोटोकॉल'प्रमाणे... पण शिंदे असलेल्या मंचावर ठाकरे येतील का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde vs Uddhav Thackeray

Thackeray Vs Shinde : आसनव्यवस्था 'प्रोटोकॉल'प्रमाणे... पण शिंदे असलेल्या मंचावर ठाकरे येतील का?

मुंबईः उद्याच्या दिवस राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. उद्या स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपत आहे. दुसरं म्हणजे विधानभवनात स्व. बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण होईल. त्यानिमित्त राज्यातले सगळे दिग्गज एकत्र येणार आहेत.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र विधानभवनात लावण्यात येत आहे. विधिमंडळाकडून या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातले सर्व महत्त्वाचे नेते हजेरी लावणार आहेत.

राज्यातील २८८ आमदार, ७८ विधान परिषदेचे सदस्य यांच्यावतीने हा कार्यक्रम संपन्न होत असल्याने तो सर्वांगीण स्वरुपाचा आहे. त्यामुळे कुणीही कार्यक्रमाची उंची कमी होईल, असं विधान कुणीही करु नये असं आवाहन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं आहे.

हेही वाचाः प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

नार्वेकरांनी सांगितलं की, सर्वांचा सन्मान होईल त्याप्रमाणे प्रोटोकॉलनुसार योग्य स्थान दिलेले आहे. शिवाय जेवढे नेते व्यासपीठावर असतील त्यांची भाषणं होतील. अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांनाही आमंत्रित केल्याचं राहुल नार्वेकरांनी सांगितलं.

हेही वाचा: Bageshwar Dham : ये तो ट्रेलर हैं... धीरेंद्र शास्त्री कुठल्या षड्यंत्राबद्दल बोलतायत?

महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या व्यासपीठावर आहेत त्याच व्यासपीठावर उद्धव ठाकरे उपस्थित राहतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर उपस्थित राहिले तर प्रोटोकॉलनुसार त्यांचं स्थान कुठे असेल? असाही प्रश्न सर्वांना पडला आहे. उद्धव ठाकरे यांच्याऐवजी आदित्य ठाकरे वा ठाकरे कुटुंबातील कुणी सदस्य उपस्थित राहणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या कार्यक्रमाकडे लागलं आहे.