esakal | राज्यात आजपासून उद्धव सरकार 
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav-thackeray-sarkar

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (गुरुवार) मुख्यमंत्री म्हणून (ता. 28) शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

राज्यात आजपासून उद्धव सरकार 

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

उपमुख्यमंत्री ‘राष्ट्रवादी’चा
विधानसभेचे  अध्यक्षपद  काँग्रेसकडे

मुंबई - राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (गुरुवार) मुख्यमंत्री म्हणून (ता. 28) शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याची जय्यत तयारी केली असून, राज्यभरातून एक लाख शिवसैनिक येणार आहेत. शिवाय देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकारांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील सोहळ्यासाठी बोलावण्यात आले आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शपथविधी सोहळ्यासाठी शिवाजी पार्कवर विस्तीर्ण व्यासपीठ उभारण्यात येत असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधिस्थळावर फुलांची सजावट केली आहे. राज्यातून सुमारे एक लाख शिवसैनिक येण्यासाठीचे नियोजन जिल्हा पातळीवरून केले आहे. शपथविधी सोहळ्यादरम्यान मराठी संस्कृतीची परंपरा सांभाळत विविध कला सादर करण्यासाठी सामाजिक कालमंचला सोहळ्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. शपथविधी सोहळा सायंकाळी होणार असल्याने रोषणाईने शिवाजी पार्क सजवण्याची तयारी सुरू आहे. ठाकरे घराण्यातील पहिलाच व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याने ठाकरे कुटुंबीयांसह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनादेखील सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि नियोजित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच राज यांना हे निमंत्रण दिल्याची माहिती शिवसेना नेत्यांनी दिली आहे. 

दिमाखदार आणि जंगी शपथविधी सोहळ्याचा संदेश देशभरात जावा यासाठी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही उद्धव ठाकरे यांनी निमंत्रित केले आहे. यात कॅप्टन अमरिंदरसिंग (पंजाब), ममता बॅनर्जी (प.बंगाल), नितीशकुमार (बिहार), अरविंद केजरीवाल (दिल्ली), अशोक गेहलोत (राजस्थान), कमलनाथ (मध्य प्रदेश), भूपेश बघेल (छत्तीसगड) यांचा समावेश आहे; तर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जून खर्गे, सी. वेणूगोपाल, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. नव्या महाविकास आघाडीचे शिल्पकार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण राहणार असून, देशभरात भाजपविरोधी राजकारणाची दिशा या महाविकास आघाडीने आखून दिल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. 

400 शेतकरी उपस्थित राहणार 
शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तब्बल 400 शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच राज्यातील अनेक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे. याबाबत शिवसेनेचे नेते आणि आमदार एकनाथ शिंदे म्हणाले की, या शपथविधीसाठी शेतकऱ्यांसह कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे, तर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, आम्ही शपथविधीसाठी विविध राज्यांमधील कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना बोलावले आहे. तसेच द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनादेखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे. 

शिवाजी पार्कवर आज सायंकाळी 6.40 ला शपथविधी 
शपथविधी सोहळ्यास एक लाख शिवसैनिक येणार 
राज ठाकरे यांना सोहळ्याचे निमंत्रण 
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना निमंत्रण 
पंजाब, बंगाल, बिहार, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण 
सोनिया गांधी, एम.के.स्टॅलिन, अखिलेश यादव यांनाही बोलावणे

loading image
go to top