Vidhan Sabha 2019 : 'तेजस ठाकरे फक्त पाहण्यासाठी आले आहेत'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 October 2019

आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा घेतलेल्या निर्णयानंतर तेजस ठाकरे हे सुद्धा सक्रिय राजकारणात उतरणार का, याबाबतचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले होते.

नगर : तेजस ठाकरे हे फक्त सभा पाहण्यासाठी येथे आले असून, ते जंगलामध्ये रमणारे आहेत, असे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी तेजस यांच्या बाबतीत आज (बुधवार) खुलासा केला. संगमनेर येथील शिवसेनेचे उमेदवार साहेबराव नवले यांच्या प्रचारासाठी ठाकरे आले होते. यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस उपस्थित होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात संगमनेर मतदारसंघात शिवसेनेचे साहेबराव नवले मैदानात आहे. नवले यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आज संगमनेर येथे झाली. या सभेला उद्धव ठाकरे यांच्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. शिवाय, व्यासपीठावर तेजस ठाकरे सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा घेतलेल्या निर्णयानंतर तेजस ठाकरे हे सुद्धा सक्रिय राजकारणात उतरणार का, याबाबतचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले होते. मात्र स्वत: उद्धव ठाकरे यांनी तेजस ठाकरे हे केवळ सभा पाहण्यासाठी आले असून, ते जंगलात रमतात, असे स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांनी बाजीप्रभू देशपांडें संदर्भात केलेल्या विधानावरून बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली, ते थोरात असतील तर आम्ही जोरात आहोत, थोरात साहेबांनी आता घरी जायला हरकत नाही. बाळासाहेब तुमचा नेता बँकॉकला पोहोचला आहे तुम्ही काळजी करू नका, अशी टीकाही उद्धव ठाकरे केली.

नगर जिल्ह्याच्या विकासकामांबरोबर शेतकऱ्यांसाठी आपण योजना करणार असल्याचे सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'नगरमध्ये आता आम्ही पाणी आणणार आहोत, या पाण्यामध्ये विकासाचं प्रतिबिंब दिसेल. निळवंडे धरण आणि पश्चिमेकडे जाणाऱ्याचा पाण्याचा समावेश आहे. नगर जिल्ह्यासाठी नवीन विकासाची कामे आम्ही हाती घेत आहोत. यामध्ये एमआयडीसी, पाण्याचा प्रश्न आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना किमान दहा हजार रुपये कसे मिळणार याची योजना मी करुन ठेवलीय. येत्या पाच वर्षात मी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन दाखवणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही केवळ कर्जमुक्तच नव्हे तर चिंतामुक्त करणार आहोत.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uddhav thackeray made big statement about tejas thackerays political entry at nagar