मी परत येईन म्हणालो नव्हतो तरी आलो..!

संजय मिस्कीन
सोमवार, 2 डिसेंबर 2019

‘मी भाग्यवान मुख्यमंत्री आहे. मी परत येईन, असे म्हणालो नव्हतो तरी आलो,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली. विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर बोलताना ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली.

मुंबई - ‘मी भाग्यवान मुख्यमंत्री आहे. मी परत येईन, असे म्हणालो नव्हतो तरी आलो,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली. विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर बोलताना ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

विरोधी पक्षनेता ही जबाबदारी असून, केवळ विरोधासाठी विरोध करण्यात राज्याचे हित नाही, असे स्पष्ट करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘तीस वर्षे ज्यांच्या सोबत मैत्री केली ते विरोधी पक्ष म्हणून समोर बसले आहेत; तर ज्यांच्याशी लढलो ते आमचे मित्र म्हणून सोबत आहेत. आम्ही सत्ताधारी असलो तरी विरोधकांसोबत राज्यातील प्रमुख समस्यांवर एकदिलाने मात करून सामान्य जनतेला आधार द्यायला हवा. विधानसभेत काम करताना सत्ताधारी व विरोधकांना दोघांनाही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायचा आहे.’ शेतकऱ्यांना चिंतामुक्‍त करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. 

देवेंद्र फडणवीसांकडून आम्ही पाच वर्षे खूप शिकलो, मात्र अंधारात कोणतेही कृत्य केले नाही, असे सांगतानाच उद्धव यांनी, शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त करण्यासाठी मध्यरात्री निर्णय घ्यायचा असला तर ते मात्र आम्ही करू, असे स्पष्ट केले.

हे नक्की वाचा :  विरोधीपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीसच

‘मी पुन्हा येईन म्हणालो होतो, पण टाइमटेबल सांगितले नव्हते’ - देवेंद्र फडणवीस
‘मी पुन्हा येईन म्हणालो होतो, पण टाइमटेबल सांगितले नव्हते’, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत त्यांना मारलेल्या टोमण्यांना प्रत्युत्तर दिले. फडणवीस यांनी ‘मेरा पानी उतरता देखकर किनारे पर घर मत बसा लेना, मै समंदर हू... लौटकर वापस आऊंगा...’ असा शेर मारत सत्ताधारी पक्षाला आव्हानही दिले आणि आपण आशा सोडलेली नाही, असे सूचितही केले. त्यांच्या उत्तरावर भाजपच्या सदस्यांनी जोरदार घोषणा देत व बाके वाजवत स्वागत केले. 

अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी फडणवीस यांना शालजोडीतून फटकारे मारले. त्याचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले की, सत्ताधारी नेत्यांची भाषणे ऐकताना ‘शोले’मधील अमिताभ बच्चनची आठवण सांगितली. धर्मेंद्रचे लग्न जमवायला गेलेल्या अमिताभने धर्मेंद्रबाबत ज्या पद्धतीने माहिती दिली तसा हा प्रकार असल्याची मार्मिक टिप्पणी फडणवीस यांनी केली. 

सध्या राजकारणात काहीही अशक्य नाही. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येत असेल तर यापुढे राजकारणात काहीही अशक्‍य नाही. परत आलो तर भुजबळ, तुमच्यासहित येईन, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. 

दरम्यान, लोकशाहीत विरोधी पक्षाचे महत्त्व कायम आहे. सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी आम्ही विरोधात बसून घेतली आहे. राज्याच्या विकासाच्या आणि जनतेच्या हितच्या कोणत्याही प्रकल्पावर सरकारला कायम सहकार्य करण्यास आम्ही पुढाकार घेऊ, मात्र विधिमंडळाचे कामकाज रेटून नेण्याचे प्रकार आम्ही सहन करणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray Talking Politics