Vidhan Sabha 2019 : युतीवरून भाजपमध्ये अस्वस्थता

वीरेंद्रकुमार जोगी
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

विधानसभा 2019  
भाजपच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या जागांवर प्रयत्नशील आहेत. तथापि, युती झाल्यास शिवसेनेला कुठली जागा द्यायची, असा पेच आहे. दुसरीकडे स्थानिकांना उमेदवारीच्या आग्रहाने कितपत न्याय दिला जातो, यावर खूप अवलंबून आहे.

विधानसभा 2019  
भाजपच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या जागांवर प्रयत्नशील आहेत. तथापि, युती झाल्यास शिवसेनेला कुठली जागा द्यायची, असा पेच आहे. दुसरीकडे स्थानिकांना उमेदवारीच्या आग्रहाने कितपत न्याय दिला जातो, यावर खूप अवलंबून आहे.

नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील सहापैकी सावनेरवगळता उर्वरित पाचही जागा भाजपने जिंकल्याने युती झाल्यास शिवसेनेला जागा कशा सोडायच्या, असा प्रश्‍न भाजपला भेडसावतोय. संबंधित जागेवरचे आमदार आणि भाजपचे इच्छुक त्यामुळे अस्वस्थ आहेत. दुसरीकडे विजय आवाक्‍यात असल्याने भाजपकडे इच्छुकांची गर्दी; तर काँग्रेसमधील कुरघोडीच्या राजकारणामुळे अनेक उमेदवार त्रस्त आहेत. 

राष्ट्रवादीकडे काटोल आणि हिंगणा हे दोन मतदारसंघ असून, त्यांचे उमेदवारही निश्‍चित आहेत. अनिल देशमुख आपल्या परंपरागत काटोलमधून कामाला लागलेत. भाजपचे आमदार डॉ. आशिष देशमुख मुदतीपूर्वीच आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसवासी झाले. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळालाय. ही जागा शिवसेनेकडे आहे. ती परत मिळावी याकरिता शिवसेना आग्रही आहे. मात्र, शिवसेनेकडे तुल्यबळ उमेदवार नाही. आजवर अनेक प्रयोग केल्यानंतरही त्यांना देशमुखांवर विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे भाजप ही जागा सोडण्यास तयार नाही. मात्र, देशमुखांना कडवी लढत देईल, असा उमेदवार भाजपकडेही नाही. चरणसिंग ठाकूर यांच्या अस्थिर निष्ठेमुळे भाजपचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. अविनाश ठाकरे बाहेरचे असल्याने त्यांनाही विरोध आहे. 

हिंगण्यात राष्ट्रवादीत एकजूट
हिंगण्यामध्ये भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे राष्ट्रवादीच्या गळाला लागलेत. माजी मंत्री रमेश बंग यांनीच त्यांच्या नावाला पसंती दिल्याने राष्ट्रवादीत एकजूट आहे. आता त्यांना काँग्रेसने स्वीकारणे गरजेचे आहे. जातीय समीकरण बघता येथे भाजपचे आमदार समीर मेघे आणि विजय घोडमारे यांच्यात तुल्यबळ लढतीची शक्‍यता आहे. शिवसेना-भाजपसाठी सर्वात अडचणीची जागा रामटेकची आहे. येथून भाजपचे मल्लिकार्जुन रेड्डी विजय झालेत. तत्पूर्वी शिवसेनेच्या आशिष जयस्वाल यांनी येथून हॅटट्रिक साधली आहे. सध्या ते खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आहेत. भाजप नेत्यांसोबतही त्यांचा घरोबा आहे. त्यांच्याबाबत भाजप नेत्यांमध्ये विशेष ममत्व आहे. मात्र, जिंकलेली जागा सोडण्यास वरिष्ठ नेत्यांचा विरोध राहील. यामुळे जयस्वाल यांची अडचण होऊ शकते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक आणि रणजित देशमुख यांचे पुत्र अमोल येथून लढण्यास इच्छुक आहेत. मात्र बाहेरचे म्हणून दोघांनाही स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. येथून चंद्रपाल चौकसे, उदयसिंग यादव, दीपक पालीवाल, प्रसन्न तिडके उत्सुक आहेत. भाजपकडून अविनाश खळतकर, योगेश वाडिभस्मे हेही उत्सुक आहेत.

बावनकुळेंविरोधात कोण?
कामठीमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कोण टक्‍कर देणार, हा प्रश्‍न आहे. सुरेश भोयर यांनी माघार घेतल्याचे समजते. नाना कंभाले दंड ठोकून आहेत. अवंतिका लेकुरवाळेंचेही नाव चर्चेत आहे. शिवसेनेचे देवेंद्र गोडबोले काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्नात आहेत. सर्वाधिक चर्चा सावनेर मतदारसंघाची आहे. आमदार केदार यांच्याविरुद्ध भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांची लढण्याची इच्छा आहे. मुख्यमंत्र्यांचाही त्यांना आशीर्वाद असल्याचे बोलले जाते. अलीकडे बससेवा उद्‌घाटनावर त्यांचा केदारांसोबत वाद झाल्याने सावनेरमध्ये दिवाळीपूर्वीच फटाके फुटायला सुरवात झाली आहे. या जागेवर शिवसेनेने दावा केला आहे. भाजपकडून सोनबा मुसळे, दिलीप जाधव, तर शिवसेनेकडून विनोद जीवतोडे व जय जाधव हेदेखील शर्यतीत आहेत. उमरेडमध्ये विद्यमान आमदार सुधीर पारवे यांचा दावा मजबूत आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात या वेळी भाजपने बौद्ध उमेदवार द्यावा, अशी मागणी आहे. अरविंद गजभिये आणि डॉ. शिरीष मेश्राम यांची नावे चर्चेत आहेत. गजभिये यांना संघटनेचा दांडगा अनुभव आहे. काँग्रेसकडून राजू पारवे सर्व शक्तीने उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्नात आहेत. येथे संजय मेश्राम यांचा दावा कायम आहे.

धुरा पालकमंत्र्यांच्या हाती
राज्याचे ऊर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यात आपले स्थान चांगलेच बळकट केले आहे. काँग्रेसचा एकही बडा नेता त्यांच्या विरोधात लढण्यास तयार नाही. पालकमंत्री म्हणून संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे.

दृष्टिक्षेपात...
भाजपसमोर सुनील केदार यांचे कडवे आव्हान. 
काटोलमध्ये राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांची सत्त्वपरीक्षा. 
काँग्रेसच्या जिल्ह्याध्यक्षांचा मतदारसंघ, रामटेक की कामठी.
हिंगणा मतदारसंघात रंगणार आजी-माजी भाजपवासींमध्ये लढत.
रामटेक, काटोलमध्ये स्थानिक उमेदवारावर कार्यकर्त्यांचा भर.
कामठीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे 
यांच्या विरोधात कोण लढणार याची उत्सुकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unrest in BJP from the Alliance in nagpur