अवकाळीचा भाजी-फळांना तडाखा; द्राक्षे, स्ट्रॉबेरीचे हंगाम लांबणीवर पडणार | Untimely rain update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Untimely rain impact on grapes

अवकाळीचा भाजी-फळांना तडाखा; द्राक्षे, स्ट्रॉबेरीचे हंगाम लांबणीवर पडणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशी : परतीच्या पावसाचा फटका (untimely rain) कृषिमालाला बसला आहे. गेले दोन दिवस अवकाळी पावसाने शेतमालाचेही (Farm production loss) नुकसान झाले आहे. हंगामी फळांना (fruits) याचा फटका बसला आहे. त्यांचा बाजारातील हंगाम लांबणीवर जाण्याची दाट शक्यता आहे; तर भाज्यांचेही (vegetables loss) यात नुकसान झाले आहे. भाज्यांची आवकही कमीच राहण्याची चिन्हे आहेत. परिणामी, या पावसामुळे फळ आणि भाज्यांचे नुकसान होऊन त्यांची आवक पुढील महिनाभर कमीच राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

हेही वाचा: आर्यन खान प्रकरणात NCBचं थोबाड फुटलंय!

सध्या बाजारात द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. रोज द्राक्षांच्या दोन ते तीन वाहने बाजारात येत आहेत. बाजारात द्राक्षांचा हंगाम मोठा असतो. द्राक्षांची मोठी उलाढाल होत असते. मात्र, हंगाम सुरू झाला असतानाच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया जाण्याची शक्यता आहे. पाणी पडल्यामुळे हाताशी आलेली द्राक्षे कुजण्याच्या अवस्थेत आहेत. द्राक्षांवर बुरशीजन्य रोगाची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, द्राक्षांच्या निर्यातीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. हीच स्थिती स्ट्रॉबेरीबाबतीतही झाली आहे.

हिवाळ्यात महाबळेश्वर येथून मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीची आवक मुंबई बाजारात होते; मात्र स्ट्रॉबेरीच्या पिकालाही या पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीची आवक लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचाच परिणाम फळबाजारावर होण्याची चिन्हे आहेत, असे व्यापारी शिवाजीराव चव्हाण यांनी सांगितले.

परतीच्या पाऊसामुळे भाज्यांना कीड लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती आहे. डाग आणि पाणी लागलेला भाजीपाला बाजारात येण्याची दाट शक्यता आहे. आधीच भाज्यांचे दर नेहमीपेक्षा दुप्पट-तिप्पट झाले आहेत. डिसेंबरपर्यंत ही आवक सुधारून भाज्यांची आवक वाढण्याची शक्यता होती. मात्र, त्यातच या पावसाच्या हजेरीमुळे शेतीचे नुकसान होऊन चांगल्या मालाची आवक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही वाढण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

loading image
go to top