वैजिनाथ घोंगडेंनी केले ऐतिहासिक माणगंगेचे पुनरुज्जीवन! ४२व्या वर्षी शासकीय नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती अन्‌ आता ७७व्या वर्षीही परिश्रम

माणगंगा पुनरुज्जीवनाविषयी भरभरुन बोलताना वैजिनाथ घोंगडे हे अत्यंत तळमळीनं भावना व्यक्त करत होते. त्यांनी केलेले नदी पुनरुज्जीवनाचे काम एखाद्या डोंगराच्या उंचीएवढे झाल्याचे दिसून आले.
sangola man river
sangola man riversakal

सोलापूर : भर दुपारची एक-दीडची वेळ. ढगाळ असं पावसाळी वातावरण. आमच्या चारचाकीनं वाढेगाव (ता. सांगोला) येथील माणनदीकडे वळण घेतलं. वाटेत ७७ वर्षांचे वैजिनाथ घोंगडे आमची वाट पहात उभे होते. त्यांना गाडीत घेऊन माण, अफ्रुका व कोरडा या नद्यांच्या त्रिवेणी संगमाजवळील बेटावर असलेल्या महादेव मंदिराकडे निघालो. नदीपात्रातून चालताना आमची प्रचंड कसरत, दमछाक होत होती. परंतु वयाचे बंधन झुगारत श्री. घोंगडे आमच्याही पुढे एखाद्या तरुणाला लाजवेल अशापद्धतीने चालत होते. त्यांचा उत्साह ओसंडून वहात होता. वाटेत माणगंगा पुनरुज्जीवनाविषयी भरभरुन बोलताना वैजिनाथ घोंगडे हे अत्यंत तळमळीनं भावना व्यक्त करत होते. त्यांनी केलेले नदी पुनरुज्जीवनाचे काम एखाद्या डोंगराच्या उंचीएवढे झाल्याचे दिसून आले.

वयाच्या अगदी ४२व्या वर्षी शासकीय नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेले, ७७ वर्षांचे उमदं व्यक्तिमत्व श्री. घोंगडे पुनरुज्जीवित झालेल्या माणगंगेची पाहणी करण्याचे आमंत्रण नेहमीच देत असत. नुकताच वाढेगाव त्रिवेणी संगमावर जाण्याचा योग आला. पूर्वीच्या काळी कायम वाहणारी माणनदी आता कधीतरी वाहते. अलिकडील काळात एकदा म्हणजे २०२१ मध्ये नदीला महापूर आल्याची नोंद आहे. बालपणी माणनदीत डुंबायचो, ग्रहण सुटल्यानंतर, उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर नदीत स्नान असायचे. आपली संस्कृती असलेली माता माणमध्ये कधीही काही फेकायचे नाही, असा मौलिक सल्ला देत आई-वडीलांनी सज्जड दमच दिलेला असे. परंतु अलिकडील काळात वाढलेल्या वेड्या बाभळी, काटेकुटे, झाडेझुडपे, अतिक्रमण, कचरा, प्लास्टीकच्या पिशव्यांनीच नदीपात्र भरलेले दिसायचे. वाळूचा तर पत्ताच नसलेल्या या नदीला ओढ्याचे रुप आले होते. नदी ही गावच्या विकासाचा केंद्रबिंदू असली पाहिजे, असा विचार करणाऱ्या श्री. घोंगडे यांचे मन नदीचे हे विदारक रुप पाहून विषण्ण झाले.

नदीची घुसमट व तगमग त्यांना पाहवेना. त्यांनी पुढाकार घेत नदी पुनरुज्जीवनासाठी मोहिमच उघडली. दुष्काळी भागाचा कायापालट होण्यासाठी सुरु केलेल्या या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. तत्पूर्वी त्यांनी माणगंगेची परिक्रमा करण्याचे ठरविले. यासाठी माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशिय संस्थेची स्थापना केली. या परिक्रमेतील प्रवासात त्यांच्यासोबत डॉ. विजयकुमार जाधव, डॉ. आप्पासाहेब पुजारी, प्रा. डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, प्रा. डॉ. अशोक शिंदे, संभाजी माळी, नागनाथ आळतेकर, विठ्ठल चव्हाण, गजानन बनकर, नारायण काटकर, बसवेश्‍वर पाटणे व विजय दिघे यांची सोबत होती. या प्रवासात नदीकाठची मंदिरे, तेथील परंपरा, संस्कृतीची त्यांना माहिती मिळाली. ज्येष्ठ साहित्यिक कै. व्यंकटेश माडगुळकरांना नदीपरिक्रमा करायची इच्छा होती पण ती अपूर्ण राहिली. महाराष्ट्राचा ५२ टक्के भाग दुष्काळी आहे. त्यातील कायम दुष्काळाची दाहकता सोसणाऱ्या सातारा, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यातील दहिवडी, आटपाडी, सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर या भागात असलेल्या माण नदीत कधीतरी पाणी असते. २०१० मध्ये माण नदी परिक्रमा केल्यानंतर २०१४ व २०२० मध्ये सांगोला तालुक्यातील ५३ कि.मी.चे पात्र व १५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तसेच आटपाडी तालुक्यातील २२ कि.मी. पात्र व सात कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमधील गाळ काढणे, स्वच्छता करण्याचे काम करत नदीचे पुनरुज्जीवन केले. २०२१ मध्ये झालेल्या पावसाने या नदीला महापूर आला.

नदीकाठच्या पाण्याचे स्त्रोत जीवंत झाल्याने परिसरातील विंधन विहिरी, विहिरी, तलाव भरून गेले. दुष्काळाची दाहकता सोसणाऱ्या या भागास काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला. लोकसहभाग व प्रशासनाच्या सहकार्यातून केलेल्या कार्याची पावतीच मिळाल्याने कृतार्थतेची भावना वाटली. श्रीक्षेत्र काशीप्रमाणे उत्तर वाहिनी असलेल्या वाढेगाव यथील संगमाजवळील बेटावर महादेवाचे मंदिर असून त्या परिसरात शे-दीडशे झाडे लावून वातावरण आल्हाददायक करण्यात आले आहे. ऐतिहासिक, धार्मिक महत्त्व असलेला हा परिसर नैसर्गिक वातावरणामुळे पर्यटनासाठी रमणीय झालेला आहे.

चोख हिशेब...

१४ फेब्रुवारी २०१०ला अकराजणांची टीम कुळकजाई (ता. माणदहिवडी, जि. सातारा) येथील सीतामाई डोंगर येथे माण नदीच्या उगमस्थानास गेली. तेथून त्यांनी तब्बल १६५ कि.मी.चा नदीतून पायी प्रवास करत सरकोली (ता. पंढरपूर) भीमा नदीचा संगम गाठला. या प्रवासात त्यांना प्रसंगी दिलासादायक तर काही खूपच वेदनादायी अनुभव आले. ते त्यांनी शब्दबद्ध केले. टीममधील सदस्य नदीप्रणाली, जलसंधारण, प्राणी-वनस्पती, माती परीक्षण, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, मंदिराची अवस्था, नदीविषयक जनजागृती, वृक्षलागवडीची जबाबदारी पार पाडत होते. तब्बल सतरा दिवस चाललेल्या या परिक्रमेनंतर ही नदी स्वच्छ करायची, तिचे पुनरुज्जीवन करण्याचे ठाण मांडले.

कै. यशवंतराव चव्हाण स्मृतिदिनी २५ डिसेंबर २०१४ रोजी कोल्हापूर पद्धतीच्या एका बंधाऱ्याच्या स्वच्छतेपासून मोहिमेस सुरवात केली. यासाठी या परिक्रमेवर लिहिलेले पुस्तक विकून त्यातून आलेल्या ५४ हजारांची रक्कम कामी आली. बंधाऱ्याच्या स्वच्छतेनंतर मुंबई, पुण्याहून मदतीचा जो ओघ सुरु झाला, तो ७५ कि.मी.पर्यंत केलेल्या नदीच्या पुनरुज्जीवनानंतरही थांबला नाही. संस्थेने काही दानशूरांना रक्कम परत केली. या काळातील साऱ्या हिशेबाच्या चोखपणे नोंदी करुन संबंधितांना त्या दिल्या गेल्या होत्या. नदीकाठी मंदिरेमाणगंगेच्या काठावर प्रत्येक गावात मंदिरे आहेत. त्यात नाझरे (ता. सांगोला) नदीकाठी असलेल्या मंदिरालगतच्या गुहेत श्रीधर स्वामींनी रामविजय, हरिविजय, जयविजय, भक्तीविजय, पांडवप्रताप, शिवलिलामृत अशी २४ प्राकृत भाषेतील ग्रंथरचना केल्याचा इतिहास आहे. श्रीधर स्वामी, रंगनाथ स्वामी, संजीवा स्वामी यांचे समाधीस्थान व ११ रुद्राची मंदिरे हे वैशिष्ट्य आहे.

इतिहासात नोंद...

छत्रपती संभाजीराजेंना पकडण्यासाठी निघालेल्या औरंगाजेब व त्याच्या सैन्याचा खवासपूर (ता. सांगोला) येथे माणनदीच्या किनारी मुक्काम होता. नदीला रात्रीत अचानक पाणी आल्याने सैन्य सैरभर झाले. तेव्हा हल्ला झाल्याचे समजून सर्वजण राहुटीबाहेर पडण्यासाठी धडपडू लागले. त्यात औरंगजेबही होता. या धावपळीत राहुटीच्या दोरीला अडकून पडल्याने त्याच्या गुडघ्याचे हाड मोडले. आयुष्यभर ते दुरुस्त न झाल्याचा मोठा इतिहास घडविण्याचे काम या माणगंगेचे असल्याची नोंद आहे.

अतिक्रमण वाढत असल्याची खंत

माणगंगेच्या जखमा पाहून मन विषण्ण झाले होते. वाळूचा प्रचंड उपसा, मानवनिर्मित अडथळे, कचरा, अतिक्रमण असं फार विचित्र वातावरण होतं. पण त्यावर लोकसहभागातून मात करत नदीचे पुनरुज्जीवन केले. आयुष्याचे सार्थक झाले. आता पुन्हा अतिक्रमण वाढू लागल्याची खंत आहे.

- वैजिनाथ घोंगडे, अध्यक्ष, माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशिय संस्था, सांगोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com